पुणे:- स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व पंडित नेहरुंनी कै. यशवंतराव चव्हाण यांना दिल्ली बोलावून संरक्षणमंत्री केले. त्यावेळी हिमालयाचे मदतीला सह्याद्री धाऊन गेला असे वर्णन यशवंतराव चव्हाणांबद्दल केले गेले. अनेक वर्ष मुख्यमंत्री म्हणून मुंबईत राहून यशवंतरावांना मुंबईत एखादे घर किंवा फ्लॅट घेता आला नाही, दिल्लीत तर लांबच. यशवंतराव अत्यंत सुसंस्कृत व सभ्य राजकारणी होते. त्यांचे वाचन अफाट होते.

देशाचे उपपंतप्रधान राहिलेल्या यशवंतरावांचा यथोचित सन्मान महाराष्ट्राने केला नाही. नवी मुंबई विमानतळाला कै. यशवंतराव चव्हाणांचे नाव दिल्यास महाराष्ट्राचे ह्या विस्मृतीत गेलेल्या सुपुत्राचा हयातीनंतर तरी सन्मान केल्यासारखे होईल.
यशवंतरावांनी शरद पवार यांना राजकीय वारसदार म्हणून सर्व ताकद दिली होती. परंतु यशवंतरावांनी कोणीही नातेवाईकांना राजकारणात आणले नाही. ह्या एकमेव माजी मुख्यमंत्र्यांने कसलीही मालमत्ता – जागा – कारखाने केली नाहीत. हा आदर्श सध्याचे राजकारणी घेतली काय?

मी कॉलेजला LLB ला असताना यशवंतराव यांना कॉलेज गॅदरिंगचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. त्यावेळी म्हणजे 1960-61 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण ते सर्व विसरुन यशवंतराव आम्हा विद्यार्थ्यांमध्ये रमून गेले व 4 तास दिले.

मोरारजीभाई देसाई पंतप्रधान असताना यशवंतराव उपपंतप्रधान झाले व येथेच त्यांची राजकिय खेळी चूकली. यशवंतरावांनी इंदिरा गांधी यांचे ऐवजी मोरारजी कामराज रेड्डी यांची बाजू घेतली. व त्यामुळे इंदिरा गांधी यांनी यशवंतरावांना दूर केले. हेच रेड्डी राष्ट्रपती झाले.

भारत चीन युद्धाचे वेळी चीनने भारताचा अपमानास्पद पराभव केला व पंडित नेहरुनची हिंदी चीनी भाई-भाई ह्या घोषणेची खील्ली उडवली. अगतीक पंडित नेहरुंनी यशवंतराव चव्हाण यांना त्यांचे मदतीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडायला लाऊन दिल्लीला संरक्षणमंत्री केले. तेव्हापासून यशवंतराव दिल्लीच्याच राजकारणात राहिले. महाराष्ट्रात ढवळाढवळ केली नाही.

छत्रपती शिवरायांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुचविले आहे. परंतु छत्रपतींचे 300 किल्ले हेच त्यांच्या कर्तबगारीचे स्मारक आहे. ज्या काँग्रेस पक्षासाठी कै. यशवंतरावांनी हयातभर कष्ट केले. त्या काँग्रेस पक्षालाही यशवंतरावांचा विसर पडलाय. कै. यशवंतराव दिल्लीला उपपंतप्रधान झाले तेव्हा मी देखील काँग्रेस पक्षात होतो. परंतु दैनंदिन राजकारण झेपणार नसल्याने मी सक्रीय राजकारण सोडून दिले.

कै. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे. कै. बाळासाहेबांचा मुंबईत बरीच स्मारके आहेत. यशवंतरावांचे एकही स्मारक मुंबई अथवा देशात नाही. तरी यशवंतराव चव्हाण यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिल्यास देशातील सभ्य व सुसंस्कृत राजकारणाचा सन्मान केल्यासारखे होईल.

-अमरसिंह जाधवराव
गोवा स्वातंत्र्यसैनिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *