पिंपरी २१ ऑगस्ट २०२६:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक यांची जयंती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जलसंवर्धनाची शपथ घेऊन साजरी करण्यात आली.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रातील जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि जलसंवर्धनाच्या चळवळीला महत्त्वपूर्ण दिशा दिली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचे स्मरण करत महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.

जलसंवर्धनाची शपथ….
“पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती असून त्याचा प्रत्येक थेंब जपणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, “पाणी अडवा, पाणी जिरवा” या विचाराला कृतीची जोड देत पाणलोट विकास, मृद व जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन तसेच भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच “माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा” हा संदेश जनमानसात पोहोचवत जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमास सहकार्य करण्याची सामूहिक शपथ उपस्थितांनी महापौर लांडगे यांच्या उपस्थितीत घेतली.
महानगरपालिकेच्या विविध विभागांनी जलसंवर्धनाच्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देऊन नागरिकांचा सहभाग वाढवावा, तसेच पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलस्रोतांचे जतन याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी महापौर रवि लांडगे यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *