पुस्तकप्रेमींसाठी ज्ञानाचा नवा खजिना; मराठी-इंग्रजी पुस्तकांसह स्टेशनरी, खेळणी, भेटवस्तू आणि शालेय साहित्याची विस्तृत श्रेणी…
पिंपरी, दि. २० : भारतातील आघाडीच्या पुस्तक विक्री केंद्रांपैकी एक असलेल्या ‘सपना बुक हाऊस’चे २६वे स्टोअर पिंपरी-चिंचवडमधील एलप्रो सिटी स्क्वेअर मॉल येथे शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. तब्बल ६० वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या ‘सपना’च्या नव्या स्टोअरमध्ये मराठी आणि इंग्रजी पुस्तकांसह स्टेशनरी, कला व हस्तकला साहित्य, भेटवस्तू, खेळणी, शालेय साहित्य, कार्यालयीन साहित्य, कॉर्पोरेट गिफ्ट्स आणि चॉकलेट्स अशा विविध वस्तू उपलब्ध होणार आहेत. याबाबतची माहिती आज गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी ‘सपना बुक हाऊस’चे व्यवस्थापकीय संचालक नितीन शाह, संचालक निजेश शाह, व्यवस्थापक सौरभ शिंदे आदी मान्यवर यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
सन १९६७ मध्ये संस्थापक-अध्यक्ष सुरेश शाह यांनी अवघ्या ४० चौरस फूट जागेत ‘सपना’ची सुरुवात केली. आज संस्थेचा विस्तार ५.५० लाख चौरस फूट प्रदर्शन क्षेत्रापर्यंत झाला असून, देशभरात २५ स्टोअर्स कार्यरत आहेत. बंगळुरूमधील ११ स्टोअर्ससह कर्नाटक, तमिळनाडू आणि नवी दिल्ली येथेही ‘सपना’ची उपस्थिती आहे. पुण्यातील हे नवीन स्टोअर ‘सपना’चे २६वे केंद्र ठरणार आहे.
नव्या स्टोअरमध्ये सर्वाधिक खपाची पुस्तके, सर्वसाधारण वाचनाची पुस्तके, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, व्यवस्थापन व व्यवसायविषयक पुस्तके, बालपुस्तके तसेच शालेय पुस्तकांचा मोठा संग्रह उपलब्ध असणार आहे. मराठी पुस्तकांनाही येथे विशेष स्थान देण्यात आले आहे.
‘सपना’ पुस्तक विक्रीसोबतच प्रकाशन क्षेत्रातही कार्यरत असून, प्रादेशिक भाषांमधील ९ हजारांहून अधिक पुस्तकांची शीर्षके आणि एक हजारांहून अधिक पाठ्यपुस्तके व स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध आहेत. ‘स्टोअर६७’ आणि ‘बीक्राफ्ट’ या ब्रँडअंतर्गत स्टेशनरी उत्पादनांची निर्मिती केली जाते. ग्राहकांच्या सोयीसाठी लॉयल्टी रिवॉर्ड पॉइंट्स, गिफ्ट कार्ड्स आणि प्रिव्हिलेज कार्ड्स यांसारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.
स्वप्रकाशन करू इच्छिणाऱ्या लेखकांसाठी ‘सपना इंक’ हे व्यासपीठ सुरू करण्यात आले असून, त्याद्वारे प्रकाशन, मार्केटिंग आणि पुस्तक विक्रीसाठी विविध सुविधा दिल्या जातात. वाचनाची सवय वाढविणे आणि पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानप्रेमींची सेवा करणे हा ‘सपना’चा प्रमुख उद्देश आहे. मुलांमध्ये वाचनाची आणि विचार करण्याची क्षमता वाढावी, यासाठी वाचन, कथाकथन, चित्रकला आणि प्रश्नमंजुषा यांसह विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.
दरम्यान, ‘सपना’च्या २६व्या स्टोअरच्या उद्घाटन सोहळ्यास मराठी लेखक व अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन विश्वास पाटील हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एलप्रो इंटरनॅशनल लिमिटेडचे दीपक कुमार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास डॉ. उमा कुलकर्णी, लेखिका व अनुवादिका आणि संचालक, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. अरुणा ढेरे, वर्षा गजेंद्रगडकर, श्रीमती रेखा साने इनामदार, अभिराम भडकमकर, डॉ. सुप्रिया सहस्रबुद्धे, भारत सासणे, अंजली कुलकर्णी, दीपाली दातार आणि मंगला गोडबोले यांचीही उपस्थिती राहणार आहे.
पिंपरी-चिंचवडसह परिसरातील पुस्तकप्रेमी, विद्यार्थी, पालक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, साहित्यिक आणि वाचकांसाठी ‘सपना’चे हे नवे स्टोअर ज्ञानाचा मोठा खजिना ठरणार आहे. पुस्तकांसोबतच स्टेशनरी, भेटवस्तू, खेळणी आणि शैक्षणिक साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांना मोठी सुविधा मिळणार आहे.
‘सपना’चे व्यवस्थापकीय संचालक नितीन शाह यांनी ग्राहकांना विविध प्रकारची उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे सांगितले. देशभरातील ‘सपना’च्या स्टोअर्सना दररोज ६० हजारांहून अधिक ग्राहक भेट देत असल्याचेही पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले.
