पिंपरी-चिंचवड, ११ जानेवारी २०२५:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा *‘सात संकल्प, पुन्हा सुरुवात’* या घोषवाक्याखाली जाहीर केला. या घोषणेमध्ये शहराच्या मूलभूत प्रश्नांवर रोडमॅप मांडण्यात आला आहे. रोजच्या पाणीपुरवठ्यापासून ते रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि पारदर्शक विकास आराखड्यापर्यंत, नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारे आश्वासन यामध्ये देण्यात आले आहे.
सहा महिन्यांचे ऑन ग्राउंड सर्वेक्षण, प्रभागनिहाय संवाद आणि जनसंवाद उपक्रमातून तयार झालेला हा जाहीरनामा पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर आधारित आहे. सतत पाणीपुरवठा, गतिमान वाहतूक, स्वच्छ परिसर, सुलभ आरोग्यसेवा आणि थेट आर्थिक दिलासा या नागरिकांच्या मागण्या ठळकपणे या प्रक्रियेतून समोर आल्या.
अजितदादांनी या जाहीरनाम्यातून सात प्रमुख ‘संकल्प’ जाहीर केले असून प्रत्येक संकल्प विशिष्ट वेळेत पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संकल्प १: दररोज स्वच्छ पाणीपुरवठा
सुरक्षित नद्या प्रत्येक घरात रोज नियोजित वेळेवर आणि उच्च दाबाने नळाद्वारे पाणीपुरवठा, शून्य टँकर अवलंबित्व आणि गळतीमुक्त पाइपलाईनसह नदी पुनरुज्जीवन व पूर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना.
संकल्प २: ट्रॅफिकमुक्त, खड्डेमुक्त पीसीएमसी
ठराविक मुदतीत रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यांची गुणवत्ता ठेकेदारांची जबाबदारी असणार. नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर, तसेच मेट्रो मार्ग व उड्डाणपूल पूर्णत्वाचा निर्धार.
संकल्प ३: देशातील सर्वात स्वच्छ पिंपरी चिंचवड शहर
शंभर टक्के कचरा वर्गीकरण, वैज्ञानिक प्रक्रियेने निपटारा, शून्य लँडफिल क्षेत्र आणि स्वच्छ परिसरासाठी गृहनिर्माण सोसायट्यांना प्रोत्साहन.
संकल्प ४: परवडणारे, हायटेक आरोग्यसेवा केंद्र
विस्तारित रुग्णालये, नवीन वैद्यकीय संस्था, १०० उपनगर क्लिनिक्स, कमी दरातील तपासण्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना मजबूत आरोग्य सुविधा देण्यावर भर.
संकल्प ५: पारदर्शक विकास आराखडा
सध्याचा मसुदा डीपी रद्द करून, नागरिकांच्या सहभागातून नवा आराखडा तयार करण्याचा निर्धार. कायदेशीर घरांचे रक्षण व विस्थापनाऐवजी पुनर्वसन यावर भर.
संकल्प ६: पीसीएमसी मॉडेल शाळा
१०० अद्ययावत महानगरपालिका शाळा — राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, आधुनिक साधनसामग्री, प्रशिक्षित शिक्षक आणि विनामूल्य सुविधा.
संकल्प ७: थेट दिलासा आणि जबाबदार प्रशासन
मोफत मेट्रो-बस प्रवास, लघु गृहधारकांना मालमत्ता कर सवलत, विद्यार्थ्यांना टॅबलेट वितरण, महिलांसाठी व्याजमुक्त कर्ज योजना आणि क्रीडा-संस्कृतीस प्रोत्साहन.
या सात संकल्पांचा पाया फक्त अभ्यास, सर्वेक्षण व संवादावर नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख राज्यकारभारावर, छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारावर, महात्मा फुलेंच्या शिक्षणसमतेच्या ध्येयावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समानतेच्या दृष्टिकोनावर आधारित आहे.
वाढत्या खर्च, संधीतील विषमता आणि दैनंदिन आर्थिक ताण या पार्श्वभूमीवर ‘सात संकल्प’ नागरिकांना थेट दिलासा, सुलभ पायाभूत सुविधा आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पिंपरी-चिंचवड जाहीरनामा घोषणांपेक्षा कृतीकडे नेणारा, ठोस नियोजन आणि प्रामाणिक प्रशासनावर भर देणारा आहे. “सात संकल्प, पुन्हा सुरुवात” — या घोषवाक्याद्वारे दादांनी शहरात कार्यक्षम, जबाबदार आणि लोकाभिमुख महानगर प्रशासनाचा आराखडा स्पष्टपणे मांडला आहे.
