पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार शितल उर्फ विजय शिंदे यांच्या प्रचाराने मोठी भरारी घेतली आहे. नुकत्याच झालेल्या एका महत्वपूर्ण घडामोडीत, प्रभाग १९ मधील भावसार समाजाने शिंदे यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केल्याने या प्रभागात भाजपची स्थिती अधिक भक्कम झाली आहे.
प्रभागातील भावसार समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक विशेष बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शितल उर्फ विजय शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या सामाजिक कार्याचा आणि त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचा आढावा घेण्यात आला. समाजाच्या प्रगतीसाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एक आश्वासक, तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून शितल उर्फ विजय शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय समाजबांधवांनी एकमताने घेतला.
यावेळी बोलताना समाजातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तींनी भावना व्यक्त केल्या की, “शितल उर्फ विजय शिंदे हे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या माध्यमातून प्रभागातील पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणाचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. म्हणूनच भावसार समाजातील प्रत्येक घटक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.”
भावसार समाजाच्या या महत्त्वपूर्ण पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शितल उर्फ विजय शिंदे म्हणाले, “समाजाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे. हा पाठिंबा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, भविष्यात प्रभागाचा कायापालट करण्यासाठी मला मिळणारी एक मोठी प्रेरणा आणि शक्ती आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयानुसार सर्वांना सोबत घेऊन प्रभाग १९ चा आदर्श विकास करणे हेच माझे स्वप्न असेल.” या पाठिंब्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, शितल उर्फ विजय शिंदे यांच्या विजयाचा मार्ग आता अधिक सुकर झाल्याचे बोलले जात आहे.
बैठकीला भावसार समाज युवा परिषद राष्ट्रीय महासचिव प्रतीक भावसार, भावसार समाज अध्यक्ष रवींद्र मुळे, सल्लागार राजीव भावसार, सचिव जयंत बाहेकर, कार्याध्यक्ष प्रफुल्ल अहिर, युवा अध्यक्ष लक्ष्मीकांत भावसार, प्रसिद्धी प्रमुख नितीन उरणकर, रहाटणी विभाग प्रमुख राजेश भावसार, रावेत विभाग प्रमुख कुणाल भावसार, आरोग्य विभाग प्रमुख गणेश जवळकर यांच्यासह भावसार समाजातील मोठ्या संख्येने युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते, ज्यांनी विजयाच्या घोषणा देत प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार केला.
