– महिला सक्षमीकरण, मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक मैदानात
इंद्रायणीनगर, प्रतिनिधी :- प्रभाग क्रमांक ८ — इंद्रायणीनगर, गवळीमाथा आणि बालाजीनगर परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत जोरदार प्रचार केला. घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत, त्यावर ठोस उपाययोजनांचे आश्वासन देत त्यांनी “प्रभागात विकासाची गंगा आणणार” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
जनसंवादादरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि महिला सुरक्षेबाबतच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. यावेळी सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांनी सांगितले की, प्रभागातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आवश्यक आहे. “सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी मी निवडणुकीच्या रिंगणात आहे,” असे त्या ठामपणे म्हणाल्या.
महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत त्यांनी महिलांसाठी स्वयंसहायता गटांना बळकटी, कौशल्य विकास प्रशिक्षण, सुरक्षित सार्वजनिक जागा, सीसीटीव्ही, तसेच आरोग्य तपासणी शिबिरे राबवण्याचे आश्वासन दिले. तरुणांसाठी क्रीडा सुविधा, अभ्यासिका, रोजगार मार्गदर्शन केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवा आणि विरंगुळ्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
इंद्रायणीनगर, गवळीमाथा आणि बालाजीनगर परिसरातील अंतर्गत रस्ते, पथदिवे, पावसाळी ड्रेनेज, स्वच्छता व्यवस्था आणि नियमित पाणीपुरवठा ही कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विचारधारेनुसार शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या मूल्यांवर आधारित विकास हेच आपले ध्येय असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहता प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शेवटी त्यांनी सर्व मतदारांना आवाहन केले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर बटण दाबून प्रभाग ८ च्या सर्वांगीण विकासासाठी सरिता कुऱ्हाडे–गोरडे यांना भरघोस मतांनी विजयी करा.
