अहिल्यादेवींच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात योगदान देणाऱ्या महिलांचा १ जून रोजी सन्मान
पिंपरी-चिंचवड: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विशाल जनसेवेच्या स्मरणार्थ, सखी सोबती फाउंडेशनच्यावतीने “अहिल्या पुरस्कार २०२५” गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १ जून २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे पुणे जिल्ह्यातील समाजसेवा, प्रशासन, क्रीडा, संस्कृती आणि स्त्री सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती सखी सोबती फाउंडेशनच्या अध्यक्षा गिरिजा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अहिल्यादेवींच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित करणे हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी, अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव संयोजक तथा माजी नगरसेवक विजय शिंदे, सुचेता गांगल, सोनल वाल्हेकर, श्रीमती प्रभावती इंदलकर, मुग्धा बोरकर, सायली काणे, हर्षदा जोशी, अश्विनी फुलपगार आदी उपस्थित होते.
सोहळ्यात ९ महिलांचा होणार सन्मान….
प्रसंगी, “अहिल्या पुरस्कार २०२५” साठी निवड झालेल्या ९ महिलांची नावे जाहीर करण्यात आली. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मशीलता पुरस्कार ह.भ.प. पूनम जाधव (प्रसिद्ध कीर्तनकार) आणि सुनिता आपटे (समाजसेविका) यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रजावत्सल पुरस्कार डॉ. कुंदाताई भिसे (संस्थापक अध्यक्ष, उन्नती सोशल फाउंडेशन) यांना, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर न्यायप्रिय शासिका पुरस्कार पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांना दिला जाईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्तीचे प्रतिक पुरस्कार श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या वैष्णवी जगताप यांना प्रदान होईल. याव्यतिरिक्त, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संवेदनशील नेतृत्व पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिल्पागौरी गणपुले, सुनिता भोसले (समाजसेविका), प्राजक्ता खारकर (समाजसेविका) आणि रेखा मराठे (समाजसेविका) यांना देऊन गौरवण्यात येणार आहे.
या मान्यवरांच्या हस्ते होणार सोहळ्याचे उद्घाटन
कार्यक्रम उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य निलेश गद्रे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू ) काटे, भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप आणि विधानपरिषद आमदार अमित गोरखे हे उपस्थित असतील.
महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, चिंचवडच्या माजी आमदार अश्विनी जगताप, विधानपरिषद आमदार उमाताई खापरे, सामाजिक कार्यकर्त्या मोनिका मोहोळ, शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी जगताप, नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रमुख विश्वस्त प्रिया गोरखे, भाजपा महिला मोर्चा पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षा सुजाता पालांडे आणि भाजपा सरचिटणीस शैला मोळक, सामाजिक कार्यकर्त्या स्वप्नाताई काटे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थी यांना गौरविण्यात येणार आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त या सोहळ्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रसिद्ध भरतनाट्यम प्रशिक्षणार्थी सायली काणे ह्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करतील, तर सुप्रसिद्ध लेखिका विनिता तेलंग प्रबोधनपर व्याख्यान देतील.