संत तुकाराम नगर/पिंपरी (प्रतिनीधी) दि.८ फेब्रुवारी २०२५ :- राष्ट्रीय श्रमिक आघाडी चे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा व कामगार वर्गाचे प्रश्न मांडून दुहेरी संगम साधला. हा कार्यक्रम संत तुकाराम महाराज मंदिर सभागृह येथे (दि.७) पार पडला. भोसले यांनी आता सहनशीलता संपली असून उपोषण करणार असल्याचे सांगताच आमदार लक्ष्मण जगताप व माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी प्रांतिक उपोषण करण्याची वेळ येणार नाही अशी ग्वाही दिली.

यावेळी आमदार शंकरभाऊ जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश प्रतिनीधी मोरेश्वर शेडगे, मा नगरसेवक वसंतराव शेवडे काका, नंदू अप्पा कदम, मा नगरसेवक राजु दुर्गे,सरचिटणीस अजय पाताडे, कैलास सानप, नंदुजी भोगले,मा नगरसेवक माऊली थोरात, उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर, राहूल खाडे, दिनेश पाटिल, कपिल शिंदे, सुनील पालांडे, राहूल खाडे आदी मान्यवर व पिंपरी चिंचवड रहिवाशी व पुरुष व महिला कामगार हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भोसले म्हणाले की,जमलेल्या हजारो पुरुष व महीला कामगार वर्गांचे आशीर्वाद खासदारांना मिळाले असून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना करतो. मा खासदार अमर साबळे यांनी जखमावर मलम लावण्याचे काम केले असून त्यांचा आभारी आहे. हजारो कामगार माझ्यासाठी नव्हे तर साबळे यांच्यावर प्रेम करतात म्हणून वाढदिवस साजरा करण्यासाठी आले आहेत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे तीन वेळेस कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी जाऊन बसलो होतो. स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या आग्रहाखातर दहा वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. भाऊ म्हणाले होते”तू संत तुकाराम नगर भागातील विरोधकांना शहरभर पसरू द्यायचे नसेल तर तू बांध म्हणून उभा राहा” तेव्हाच शहरात भाजपाची सत्ता येईल. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आली. परंतु कामगाराचे प्रश्न मार्गी लागले नाहीत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचे आहे कारण नागपूर येथे त्यांच्या हस्ते कमळाच्या चिन्हाची मफलर गळ्यात टाकून प्रवेश केला होता. लक्ष्मण भाऊ जसे लोकनेते झाले तसेच शंकर भाऊ लोकनेते व्हावेत ही आमची इच्छा आहे. तब्बल ३९ वर्ष झाले स्वतःचे सोने गहाण ठेवून उपोषण, आंदोलन व ११७ प्रकरणाचा न्यायालयीन लढा लढतो आहे. “भगवान के घर देर है अंधेर नही”परंतु डोळ्यासमोर अंधार पडल्यावर देव बघून उपयोग होणार नाही. पद,प्रतिष्ठा नको न्याय हवा आहे. शंकर भाऊ कडून खूप अपेक्षा आहेत. एक महिन्यात आपल्या सरकार कडून न्याय न मिळाल्यास प्राणांतिक उपोष व आत्मक्लेश करणार आहोत अशी भावना भोसले यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

बारामती तालुक्यातून गरीब कुटुंबातू पिंपरी चिंचवड येथे येऊन अमर साबळे यांनी अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांनी सामाजिकच नव्हे तर राजकीय अस्तित्व निर्माण केले. यामध्ये त्यांना स्व गोपीनाथराव मुंडे व भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेते मंडळींनी मदत केली आहे. साबळे यांनी मलम लावल्यामुळे जखम पुन्हा उद्भवणार नाही. यशवंत भाऊचे राजकीय पुनर्वसन व लक्ष्मण भाऊ यांनी दिलेला शब्द पूर्ण करणार आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांना प्राथमिकता देतात. भाजपा उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही. लाखो कामगार वर्ग भाऊच्या मागे असल्याचा अनुभव घेतला आहे. भाजपासाठी काम केलेल्या दहा वर्षाचे फळ नक्कीच यशवंतभाऊ आपणास भेटेल असे मत आमदार शंकर भाऊ जगताप यांनी व्यक्त केले.

अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना साबळे म्हणाले की, वाढदिवसानिमित्त आशिर्वाद देण्यासाठी आपण जमलात हीच आयुष्याची पुंजी आहे. या आशीर्वादाने रंजल्या गांजल्यांची सेवा व शोषित, वंचितांसाठी आयुष्य समर्पित करण्याची भावना निर्माण झाली आहे.यशवंत भाऊंना आश्वासित करतो की तुम्ही या श्रमिकांसाठी आयुष्यभर झुंज दिलेली असून कष्ट घेतलेले आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न केलेला आहे.स्वतःसाठी पद,प्रतिष्ठा मागितली नाही. तुम्ही या ठिकाणी बसलेल्या सर्व श्रमिकांच्या जीवाचे प्राण आहात. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही. मागण्या ऐकण्यासाठी कामगार मंत्र्यांना या ठिकाणी आणणार आहे. पृथ्वी शेषनागाच्या नव्हे तर श्रमिकांच्या हातावर तरली असून त्यांचे प्रश्न सोडणे गरजेचे आहे. पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येण्यासाठी यशवंत भाऊ चे प्रश्न सोडवावे लागणार आहेत. जोपर्यंत श्रमिकाचे प्रश्न सुटणार नाहीत तसेच बहुजनांचे कल्याण व हित होणार नाही तोपर्यंत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा सुखी व संपन्न समाज घडणार नाही. शोषित,पीडित वर्गाचे प्रश्न सुटतात तोच समाज सुखी संपन्न होऊ शकतो. कौतुक नाही झालं तरी चालेल श्रमिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत.

शत्रघुन काटे, मोरेश्वर शेडगे,राजू दुर्गे,माऊली थोरात आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू अप्पा कदम व आभार जयदेव अक्कलकोटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *