चिंचवड, ता. ६ : महाराष्ट्र चुकीला माफी करतो मात्र, गद्दारांना कधीच क्षमा करत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही लढाई आहे. बापाशी गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे. आता पवार साहेबांना केवळ जिंकताना पाहायचं असून महाराष्ट्राच्या रक्षणासाठी व स्वाभिमानासाठी महाविकास आघाडीला विजयी करा असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाकड येथे केले.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचाराचा बुधवारी (ता. ६) ग्रामदैवत म्हातोबा चरणी डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. संजोग वाघेरे, तुषार कामठे, इम्रान शेख, मयुर कलाटे, संपत पवार, माजी सरपंच राजाभाऊ भुजबळ, विशाल वाकडकर, अनिता तुतारे, सागर तापकीर, विशाल काळभोर, मयूर जाधव, विक्रम वाघमारे, चेतन पवार, साकी गायकवाड, मोहन भुमकर, ज्योती निंबाळकर, चेतन बेंद्रे, विक्रम विनोदे, केसरीनाथ पाटील, कौस्तुभ नवले, मोहन विनोदे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म जागविताना मोठे बलिदान द्यावे लागले. मात्र, हाच महाराष्ट्र धर्म दिल्लीकरांनी संपविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा ८४ वर्षांचा योद्धा सरसावला. सचिन अहिर म्हणाले, २३ तारखेला गुलाल उधळायाला आणि म्हातोबा चरणी नतमस्तक व्हायला सर्वांना पुन्हा यावं लागेल. राहुल कलाटेंना व महाविकास आघाडीला विजयी करण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे. राहुल कलाटे म्हणाले, महाविकास आघाडीतील सर्व वरिष्ठ नेत्यांनी वाकड वासियांवार टाकलेला विश्वास आपल्याला सार्थ करायचा आहे. मागिल अनुभव आणि येणारीं निवडणूक याची उत्तम सांगड घातली तर विजयापासून आपल्याला कोणी रोखणार नाही.
शुभारंभानंतर काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. हलगी, तुतारी, ताशाच्या गजरात निघालेल्या पदयात्रेचे फटाक्याच्या आतिषबाजीत जागोजागी स्वागत झाले. वाकड गवठाण, वाकड चौक, उत्कर्ष चौक, माऊली चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सम्राट चौक, वेणु नगर, पिंक सिटी रोड, छत्रपती चौक, अंबियांस हॉटेल-मानकर चौक, वाकड चौक या मार्गे भव्य पदयात्रा काढण्यात आली. संपत विनोदे यांनी सूत्रसंचालन केले.