पिंपरी :- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला. याबाबतचे पत्र पक्षाच्यावतीने अण्णा बनसोडे यांना देण्यात आले आहे. त्यानंतर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातील कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्या प्रचारात सक्रिय भूमिका घेतली आहे.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष शरद म्हस्के यांनी आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी शहर उपाध्यक्ष गणेश भोसले, गणेश फरांदे, ऋषिकेश म्हस्के, किरण पन्हाळे, महेश जाधव, आरपीआय (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल ओव्हाळकर, माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे आदी उपस्थित होते.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष शरद म्हस्के म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांनी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानुसार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. पक्षातील वरिष्ठांनी महायुतीच्या उमेदवारांचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात महायुतीच्या उमेदवारांचे काम केले जाणार आहे.
आमदार अण्णा बनसोडे यांची काम करण्याची हातोटी चांगली आहे. त्यांच्याकडून पुढील काळात देखील चांगले काम केले जाईल. त्यामुळे आम्ही अण्णा बनसोडे यांच्या विजयासाठी प्रयत्नशील असणार आहोत. पिंपरी विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग हा समाज जास्त आहे. त्यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची महायुतीला चांगली मदत होईल, असेही म्हस्के म्हणाले.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा आगामी निवडणुकांमध्ये योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी यावेळी दिले.