-भीमाबाई फुगे, सम्राट फुगे यांच्या प्रवेशामुळे तरुणाईची ताकद अजित गव्हाणे यांच्या पाठीशी
-सुसंस्कृत, उच्चशिक्षित नेता अजित गव्हाणे यांच्या रूपाने शहराला लाभणार- भीमाबाई फुगे
भोसरी 31 ऑक्टोबर ( प्रतिनिधी):
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या गडाला अजित गव्हाणे यांनी सुरुंग लावला असून येथील भाजपचा गड ढासळताना दिसत आहे. भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई पोपटराव फुगे यांनी स्थानिक नेतृत्वाच्या दबावाला कंटाळून भाजपला रामराम करत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. स्थानिक नेतृत्वामुळे नाराज असून “आम्हाला शरद पवार साहेब यांचे नेतृत्व मान्य असल्याचे सांगितले. आगामी काळात गव्हाणे यांच्या माध्यमातून या शहराला सुसंस्कृत नेता मिळणार आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. दरम्यान भिमाबाई फुगे तसेच सम्राट फुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित गव्हाणे यांची ताकद प्रचंड वाढली असून तरुणाईची फळी या माध्यमातून त्यांच्या मागे उभी राहणार आहे.
बारामती येथे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या भोसरीतील माजी नगरसेविका भिमाबाई फुगे यांनी पक्षप्रवेश केला . यावेळी युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, हभप राजाराम महाराज फुगे, राणोजी कंद, दामोदर फुगे, गणपत गव्हाणे रोहिदास माने आदी उपस्थित होते. भीमाबाई फुगे यांच्या सोबत सम्राट फुगे, प्रसाद कोलते, प्रशांत लांडगे सुदेश लोखंडे, गणेश कंद आदींनी पक्ष प्रवेश केला.
भोसरी गावठाणातील या मातब्बर मंडळीमुळे भोसरीच्या गावखात्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.यापूर्वी मोशीतील लक्ष्मण सस्ते यांनी भाजपमधून बाहेर पडत अजित गव्हाणे यांच्यासोबत काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता भोसरी गावठाण परिसरातील राजकीय समीकरणे बदलताना दिसून येत आहेत. भिमाबाई फुगे यांच्या समवेत पक्षात प्रवेश केलेले सम्राट फुगे यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केलेली आहे. तरुणाईला सोबत घेऊन भोसरी परिसरामध्ये अनेक सामाजिक कामे करण्यात त्यांचा पुढाकार आहे. त्यांच्या माध्यमातून तरुणांची मोठी शक्ती गव्हाणे यांच्या मागे उभी राहणार आहे
भीमाबाई फुगे या प्रभाग क्रमांक सात भोसरी गावठाण मतदार संघातून गेल्या पंचवार्षिक मध्ये निवडून आलेल्या होत्या. त्यांनी दोन हजार सातशे ७८ मतांनी विजय संपादन केला आहे. नगरसेविका भीमाबाई फुगे यांचे माहेर कासारवाडीचे. त्यांचे भाऊ दत्तात्रेय लांडगे तसेच भावजय सुरेखा लांडगे भीमाबाई फुगे हे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांचे सासरे दिवंगत सदाशिवराव फुगे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आजही भोसरी पंचक्रोशीत सांगितला जातो. त्यांचे पती पोपटराव फुगे हे पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष होते. तर दीर हभप राजाराम महाराज फुगे हे कीर्तनकार आहेत. नगरसेविका भीमाबाई फुगे या नवज्योत मित्र मंडळाच्या महिलाध्यक्षा आहेत. नातेगोते तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून भीमाबाई फुगे यांचा भोसरी गावठाण भागामध्ये प्रभाव आहे. त्यांच्या पक्षप्रवेशांमध्ये गावठाणातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. याचा फायदा अजित गव्हाणे यांना होणार असल्याचे सांगितले जात आहे.
……….
अजित गव्हाणे यांच्या रूपाने पिंपरी चिंचवड शहराला उच्चशिक्षित आणि संस्कृत चेहरा लाभणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कामाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. विचारांचे स्वातंत्र्य देखील तेवढेच महत्त्वाचे असते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शहराला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी अजित गव्हाणे यांचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे.