चिंचवड :- दिशा फाउंडेशन आयोजित दिवाळी फराळाच्या या कार्यक्रमानिमित्त खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पिंपरी – चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. बुधवारी (ता. ३०)) वाकड येथील दिशा फौंडेशन आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात डॉ कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधत राजकीय फटकेबाजी केली. सलग दोन दिवस खासदार अमोल कोल्हे चिंचवड मतदारसंघात आहेत. आजच्या कार्यक्रमाला त्यांनी दिलेला वेळ बघता त्यांचे मित्र आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी राजकीय डिप्लोमसीची संधी कोल्हे यांनी साधली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. योगायोग असा की डॉ कोल्हे यांचा पिंपरी चिंचवडमधील पहिला कार्यक्रम २००९ साली दिशा सोशल फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. आज तब्बल १५ वर्षांनी पुन्हा त्यांनी चिंचवड शहरात लक्ष घातले आहे.
वाकड येथील हॉटेल बर्ड व्हॅली येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार अमर साबळे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, माजी महापौर संजोग वाघेरे, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, नाट्यनिर्माते राहुल भंडारे, राज्य नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पिंपरी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे, महायुतीचे उमेदवार शंकर जगताप, सचिन चिखले, माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, योगेश बाबर, सचिन साठे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, शत्रुघ्न काटे, मयूर कलाटे, सुरेश भोईर, धनंजय काळभोर, तुषार हिंगे, बाळासाहेब मोरे, संतोष कांबळे, महेश कुलकर्णी, अमित बाबर, विशाल यादव आदींनी हजेरी लावली.
दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर यांनी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. माजी अध्यक्ष गोरख भालेकर, जगन्नाथ शिवले, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, खजिनदार नंदकुमार कांबळे आदींसह दिशा सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी संयोजन केले.
—
लोकसभेला महाविकास आघाडी सोबत नसलेल्या नेत्यांबद्दल मी काही बोलणार नाही. मी, माझा अशी ही निवडणूक नाही. महाराष्ट्रधर्म वाचविण्याची ही निवडणूक आहे. नेत्यांना आता काय वाटते याबद्दल मी बोलणार नाही. नाना काटे यांनी आपले गाऱ्हाणे त्यांच्या पक्ष नेत्यांकडे मांडावे. चिंचवडची जागा अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांसाठी सोडवून घेऊ शकले नाहीत हे वास्तव आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका संवादाची आहे. एकदा शून्यावर आउट झाला म्हणजे सचिन पुन्हा सेंचुरी करत नाही असे नाही. त्यामुळे आपण निकालाची वाट बघुयात.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार
—
महाविकास आघाडीच्या जागा वाटपापूर्वी नाना काटे, चंद्रकांत नखाते, मी, आम्ही सर्व जण पवार साहेबांना भेटलो होतो. बंडखोरी करणार नाही असा शब्द आम्ही साहेबांना दिला होता. साहेबांना शब्द दिल्यानुसार आम्ही समन्वय साधतो आहे. सर्वांसोबत संवाद साधणार. लवकरच वेगळे चित्र दिसेल. कालच्या उमेदवारीच्या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चिंचवडची जनता सुज्ञ आहे. जनता योग्य निर्णय घेईल.
– राहुल कलाटे, उमेदवार, महाविकास आघाडी (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)