कवी, लेखकांनी खेळला महिला साहित्यिकांसोबत भोंडला
दिलासा संस्थेचा उपक्रम
चिंचवड गाव – दिलासा संस्थेच्या वतीने चिंचवड गाव येथील समरसता गुरुकुलम येथे दुर्गाष्टमीच्या दिवशी एक ऐतिहासिक नोंद घ्यावी असे काम पिंपरी चिंचवड शहरातील साहित्यिकांनी केले. पुरुष साहित्यिकांनी महिला साहित्यिकांसोबत भोंडवा खेळला.
विशेष म्हणजे ही भोंडला गीते पारंपारिक चालीत होती पण आजच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारी होती.
कवी सुरेश कंक भोंडला गीत सादर करताना रक्तदानाचे महत्त्व सांगतात..
रक्ताचे दान बाई रक्ताचं दान..
वाचवू एका जीवाचे प्राण
माणुसकीची ठेवूया जाण
एकोपा ठेवून काम करू छान..
तर ज्येष्ठ कवयित्री संगीता सलवाजी आपल्या भोंडला गीतातून औषधी झाडे आपल्या दारी असावीत यासाठी सांगतात..
एक झाडं लावू बाई दोन झाडं लावू
तुळस ,झेंडू, गवती चहा लावू
औषधी झाडे माझ्या अंगणात
भोंडला खेळू बाई भोंडला खेळू..
तर कवयित्री वर्षा बालगोपाल कामाला जाणाऱ्या महिलांची लगबग भोंडल्यातून वर्णन करताना म्हणतात..
जीवनाच्या वाट आव्हानाची ताट
आज कोणत आव्हान आलं गं बाई..
कसं तू पेललं ते सांग बाई..
चूल नी मूल सांभाळून
ऑफिसला मला जायचं गं बाई..
लवकर उठून, स्वयंपाक करून
छोट्याला शाळेत पाठवायची घाई..
गाडीला किक मी मारते गं बाई..
कवयित्री राधाबाई वाघमारे यांनी अंधश्रद्धेवर प्रहार करणारा भोंडला सादर केला. त्या म्हणतात..
लिंबू मिरची गाडीला लावू नका
वेताळ भुताला उगी भिवू नका..
जादूटोण्याचा नाद नको बाई..
विज्ञानाची कास धर तू गं बाई..
अशी प्रबोधन करणारी भोंडला गीते सादर केली.
हरिभक्त परायण अशोक महाराज गोरे, नारायण कुंभार, शोभा जोशी, कवी प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी आणि गुरुकुलमचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी फेर धरून भोंडला गीते म्हणण्यासाठी साथ दिली.