-भोसरी सेक्टर १२ मध्ये धुरीकरण; ७ हजार रहिवासीयांना दिलासा
भोसरी : शहरात डेंगू, चिकनगुनिया, झिका आणि मलेरियाची साथ सुरू आहे. भोसरी येथील सेक्टर 12 या भागात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. येथे तातडीने धुरीकरण करण्याची गरज होती. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आरोग्य यंत्रणेला जागे केले. गव्हाणे यांच्या पुढाकारामुळे आरोग्य यंत्रणेने तात्काळ दखल घेत या भागात धुरीकरण केले. यामुळे सेक्टर 12 या भागातील ७ हजार रहिवासीयांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत अजित गव्हाणे म्हणाले, पीएमआरडीएतर्फे स्पाईन रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या भोसरी सेक्टर १२ येथील गृह प्रकल्पातील सोसायट्यांमध्ये डेंगू, मलेरिया, झिका,चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव गेल्या महिन्याभरापासून वाढला आहे. याबाबत पालिकेकडून योग्य उपाय योजना केल्या जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम हाती घेतली जाते . मात्र त्यानंतर या आजारांना आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. यामुळे येथे रोगांचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तपासणी मोहीम करणे,नागरिकांना नोटिसा बजावणे. एवढेच सोपस्कार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पार पाडले जातात अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या.
नागरिकांनी याबाबत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडे तक्रार केली. या भागांमध्ये रुग्णांची संख्या पाहता तातडीने धुरीकरण करावे अशी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन तात्काळ गव्हाणे यांनी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून धुरीकरण करण्यात यावे अशी सूचना देखील त्यांनी केली होती. त्यांच्या सूचनेची दखल घेऊन महापालिकेने या भागामध्ये धुरीकरण सुरू केले असून दररोज तीन इमारतीमध्ये धुरीकरण करण्यात येणार आहे. या भागात साधारण 7 हजार नागरिक राहतात. कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव धुरीकरण केल्यानंतर कमी होणार असल्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे गव्हाणे यांनी सांगतिले.