पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेकरीता विकसीत करण्यात आलेल्या GIS Enabled ERP प्रकल्पांतर्गत माहिती अधिकार संगणक प्रणालीचे महानगरपालिकेच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागरिकांना सुलभ पद्धतीने माहिती मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती, छाननी आणि माहिती उपलब्ध करून देण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या संगणक प्रणालीचे प्रशिक्षण सत्र चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे पार पडले. प्रसंगी, प्रश्नोत्तराद्वारे अधिकारी व कर्मचारी यांना उदभवणा-या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
स्मार्ट सिटी व माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत संगणक प्रणालीचे दोन सत्रामध्ये मनपा विभागातील माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ विषयक कामकाज पाहणारे जन माहिती अधिकारी, लिपिक / मुख्य लिपिक आणि संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेतले.
यावेळी, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, दिपक पवार, अविनाश पाटील, डॉ. प्रशांत परसाई यांच्यासह विविध विभागांचे जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एवीडेन इंडिया प्रायवेट लिमिटेड या संस्थेच्या वतीने संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून त्यांच्याद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
माहितीच्या अधिकारांतर्गत माहितीची देवाण घेवाण सुलभ, जलद व ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचे प्रशिक्षण सामान्य प्रशासन विभाग, कर संकलन, लेखा, लेखापरीक्षण, आरोग्य, वैद्यकीय, स्थापत्य, विद्युत यासह विविध विभागातील, क्षेत्रिय कार्यालये, विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सकाळी आणि दुपारी दोन सत्रात हे प्रशिक्षण पार पडले.