-खोपोलीत संजोग वाघेरेंच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक समाजाचा मेळावा
खोपोली, (प्रतिनिधी) :- देशात लोकशाही टिकवायची असेल, तर हुकूमशाही सरकारला घरी बसवले पाहिजे. महाराष्ट्राचे हित साधण्याचे, समाजातील सर्व घटकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम फक्त महाविकास आघाडीच करू शकते. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठवू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे राष्ट्रीय अल्पसंख्याक अध्यक्ष सिराज मेहंदी यांनी व्यक्त केले.
खोपोली येथे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रवक्ते नासिम सिद्दिकी, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे मोहम्मद नजीर, सुलतान मालदार, रियाज पठाण, असलम खान, राशिद भाई, यांच्यासह मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिराज मेहंदी पुढे म्हणाले की, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत हिंदू – मुस्लिम या दोन समाजात दंगल घडवण्याचे काम केले आहे. आपल्या देशात अशांतता पसरलेली आहे. या सर्वांना आळा घालण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल. त्या करिता देशहिताची, देशातील सामाजिक ऐक्याची आणि सर्वसामान्य वर्गाच्या बाजुने भूमिका घेणा-यांना निवडून द्यावे लागेल. संजोग वाघेरे पाटील सर्वांना सोबत घेऊन जाणारे उमेदवार आहे. त्यांना साथ देण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे ही मुस्लिम समाजाचे कवच होते. आज आमच्याकडे गद्दार आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून द्ययाची आहे. हे सरकार आप आपसात वाद वाद घडवून आणण्याचे काम करीत आहे. त्यांची ही हुकूमशाही घालविण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. म्हणूनच मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे पाटील चार लाखांचे मताधिक्य मिळवून विजयी होतील, हा विश्वास सामान्य मतदारांकडून देखील या निडणुकीत व्यक्त होत आहे.
यावेळी ही निवडणूक गद्दार विरुद्ध इमानदार अशी निवडणूक आहे. चारशे पार नाही दोनशे पार ही होवू देणार नाही असे रियाज पठाण म्हणाले. सुल्तान मालदार, मोसेन खान, असलम खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बदल घडविण्याची हीच वेळ – संजोग वाघेरे पाटील
मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, आज देश कोणत्या पातळीवर जायला पाहिजे होता. आता कुठे आहे. आज पर्यंत मोदी सरकारने आश्वासने दिली. काळे धन आणू , सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यात पंधरा लाख जमा करू, दोन लाख तरुणांना नोकऱ्या देवू , काळा पैसा आणू असे काहीही केले नाही. आज पर्यंत खोटी आश्वासने दिली. “ना खाऊंगा, ना खाने दुंगा” असा या सरकारचा जुमला आहे. आपल्या भारताचा नागरिक प्रेमळ आणि भावनिक आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेवून ते पुढे गेले. परंतु, महागाई, बेरोजगारी यावर एक शब्द ते आज बोलत नाही. त्यामुळे बदल घडविण्याची हीच वेळ आहे. येणाऱ्या 13 तारखेला मशाल चिन्हावर शक्कमोर्तब करून या बदलाचे साथीदार व्हा, असे आवाहन त्यांनी केले.