पिंपरी : मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार हे गेल्या बारा वर्षांपासून आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, फळे वाटप, आरोग्यसेवा पुरवत आहेत. याची दखल घेऊन श्री अलंकापूरी पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळ्यात वृक्षमित्र अरुण पवार यांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
अनेक वर्षापासून ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (धाकटे माऊली) हे या सोहळ्याचे नियोजन करतात. श्री क्षेत्र सोमेश्वर मंदीर सोमेश्वरवाडी मार्गे श्री अलंकापूरी पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा मार्गक्रमण करीत वाकड भूमकर चौक येथे विसावला. यावेळी दिंडी क्र. १६ चे विनेकरी ह.भ.प. कन्हैय्यालाल महाराज भूमकर यांच्या निवासस्थानी भूमकर वतीने वारकऱ्यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित सोहळ्यात वृक्षमित्र अरुण पवार यांचा ह.भ.प. माऊली महाराज कदम, जिल्हा परिषद सदस्य कन्हैय्यालाल भूमकर, शंकर मोडेकर, मारुती कोकाटे, ह.भ.प. बापूसाहेब उफल, ह.भ.प. डी. डी. फूगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम म्हणाले, की अरुण पवार हे आळंदी ते पंढरपूर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गेली बारा वर्षे मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देतात, तसेच आपल्या महाराष्ट्राची सांप्रदायिक संस्कृती टिकून राहिली पाहिजे या भावनेने आतापर्यंत २० भजनी मंडळ यांना टाळ , मृदंग , तबला , पेटी , असे साहित्य भेट देण्यात आलेले आहेत तसेच ,१००० पुढे संत ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी दान स्वरूपात भेट देण्यात आलेली आहेत हे स्तुत्य आहे. तसेच फळे वाटप, अन्नदान, आरोग्य सुविधा पुरवीत आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर छोटा निवारा व वारकऱ्यांचे भजनाचे साहित्य ठेवण्यासाठी एक एक छोटी खोली करून दिले जाते. याबरोबरच 25 हजाराहून जास्त झाडे लावून उन्हाळ्यामध्येही सहा ते सात टँकरच्या माध्यमातून झाडे जगवतात. ज्या ठिकाणी झाडांना पाण्याची गरज भासेल, अशा ठिकाणी पाण्याचे टँकर मोफत पुरवून वृक्ष संगोपणाचे कार्य करीत आहेत.