पिंपरी : मानवी हक्क संरक्षण आणि जागृती आणि दिलासा संस्था या पिंपळे गुरव – सांगवी परिसरातील संस्थांच्या वतीने शिल्पांची साफसफाई संस्थेच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने केली.
नवी सांगवी येथील ‘बेटी बचावो’ शिल्प , नर्मदा गार्डन जवळील ” भगवान शिवशंकर ‘ शिल्प, तसेच पिंपळे गुरव जवळील रामकृष्ण मंगल कार्यालय येथील ‘कृष्ण बासरी ‘ शिल्प या शिल्पांच्या भोवतीचा परिसर साफ करून, ही शिल्पे पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आली. या उपक्रमाला स्वामी समर्थ शक्तीपीठ फुगेवाडीचे संस्थापक नंदकिशोर वाखारे उपस्थित होते. गुणवंत कामगार आण्णा गुरव, बाळासाहेब साळुंके, संजना करंजावणे, गणेश वाढेकर, ज्येष्ठ नागरिक प्रताप देवडकर यांनी सहभाग घेतला.
यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले ” आपण प्रत्येक काम महापालिकेने केले पाहिजे असे म्हणतो ; पण एक जबाबदार नागरिक म्हणून पुढे येऊन कर्तव्य म्हणून काही काम केले तर मिळणारा आनंद मोठा असतो. सुट्टीच्या दिवसाचा खरा आनंद आज सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे.”
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले ” सततच्या वाहतुकीमुळे आणि प्रदूषणामुळे चौका चौकातील ही शिल्पे मलीन झाली होती. आपण जसे आपले घर, अंगण उत्तम प्रकारे साफ करतो तसेच आपण राहतो त्या परिसरातील ही शिल्पे देखील साफसूफ असायला हवीत. ही सुंदर शिल्पे आपल्या भागातील सौदर्य खुलवित असतात. येता जाता माणसे या देखण्या शिल्पांकडे पाहात असतात. त्या शिल्पांचे अभंग्यस्नान झाले पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.