देवापेक्षा भक्त मोठा, म्हणून श्रीगणेशासोबत मोरया महाराजांचे नाव – नामदेवशास्त्री महाराज

चिंचवड, दि. 29 डिसेंबर – कुठलाही देव मोठा नसतो. तर त्या देवाचे भक्त मोठे असतात. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज हे भगवान श्रीगणेशाचे भक्त होते. आज जिथे गणपती आहे, तिथे मोरया महाराज आहेत. हा भक्तीचा महिमा आहे, असे प्रतिपादन श्री भगवानगड संस्थानचे प्रमुख मठाधिपती नामदेवशास्त्री महाराज यांनी केले.

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवास शुक्रवारी (दि. 29) सुरुवात झाली. श्री भगवानगड संस्थानचे प्रमुख मठाधिपती नामदेवशास्त्री महाराज यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, विधानपरिषद आमदार उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, अश्विनी चिंचवडे, राजाभाऊ गोलांडे, राजेंद्र काटे, विठ्ठल भोईर, नामदेव ढाके, देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र देव, राजेंद्र उमाप, केशव विद्वांस, देवराज डहाळे आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवस्थानच्या सन २०२४ च्या दिनदर्शिका आणि ‘भक्तिभाव देखोनिया चिंचवडी आला’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या इंग्रजी संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

श्री नामदेवशास्त्री महाराज म्हणाले, “वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने श्री मोरया गोसावी महाराज मंदिराचे खूप महत्त्व आहे. श्री मोरया गोसावी महाराजांचे नाव अजरामर आहे. मंगलमूर्ती मोरया असे म्हटल्याशिवाय आपल्या कोणत्याही कामाची सुरुवात होत नाही. श्री मोरया गोसावी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी आलो आहे. श्रेय (ज्ञान) आणि प्रेय (भौतिक) अशा दोन प्रकारचे जग आहे. साधू, संत, महंत हे श्रेयाच्या जगात येतात. ज्ञानियांकडे ज्ञान मागितले पाहिजे. ज्ञानाशिवाय त्यांच्याकडून काहीही मिळणार नाही.

महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहर मोरया गोसावी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. त्यामुळे या शहरात काम करताना खूप आनंद वाटत आहे.”

साधक म्हणून नेहमी मोरया गोसावी महाराजांच्या सेवेत राहू, असे आश्वासन भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिले.

विश्वस्त जितेंद्र देव यांनी प्रास्ताविक केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. देवराज डहाळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *