‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ शब्दधन काव्यमंचाचा उपक्रम

पिंपरी (दिनांक : २३ डिसेंबर २०२३) “दगडातून फुटणारा पाझर म्हणजे माझे साहित्य आहे; तसेच आईकडूनच मी साहित्याचे धडे शिकलो!” असे भावोत्कट उद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी रॉयल रोहाना गृहसंकुल, वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी काढले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या विशेष उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांच्या हस्ते प्रा. तुकाराम पाटील यांचा प्रा. मंगला पाटील यांच्यासमवेत हृद्य सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि गीता जयंतीचे औचित्य साधून भगवद्गीता असे सन्मानाचे स्वरूप होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रा. तुकाराम पाटील पुढे म्हणाले की, “आईच्या कृपाशीर्वादाने मला उच्चशिक्षणाची संधी मिळाली. निरक्षर आईने जात्यावर दळताना म्हटलेल्या गाण्यांमधून माझ्यातील कवी उदयास आला. बॅ. पी. जी. पाटील, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, सुरेश भट या दिग्गजांचे पाठबळ, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन यामुळे मी साहित्यिक म्हणून घडलो. जगण्याच्या संघर्षात आलेल्या अनुभवांनी मला दगडासारखे घट्ट बनवले अन् याच संचिताला मी शब्दरूप दिले. नवोदित साहित्यिकांनी प्रसिद्धीचा हव्यास न धरता आत्मसंतुष्टीसाठी लेखन करावे!” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी तुकाराम पाटील यांच्या कवितांचे रसग्रहण केले. नंदकुमार मुरडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “वंदनीय व्यक्तिमत्त्वांना सन्मानित केल्याने संस्कृतीचाच सन्मान होतो!” असे मत मांडले.

तानाजी एकोंडे यांनी सादर केलेल्या “ओंकार स्वरूपा…” या भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून, “सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ सातत्याने विविध साहित्यप्रकारांची साधना करून प्रा. तुकाराम पाटील यांनी सुमारे चाळीस पुस्तकांचे लेखन केले आहे!” अशी माहिती दिली. शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांनी विविध प्रसंगांचे कथन करून प्रा. पाटील यांच्या समाजातील वैविध्यपूर्ण प्रतिमा अधोरेखित केल्या; तर प्रा. मंगला पाटील यांनी कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर राधाबाई वाघमारे, कैलास भैरट, शोभा जोशी, रघुनाथ पाटील, राजेंद्र घावटे, सुलभा सत्तुरवार, शरद शेजवळ यांनी मनोगतांच्या माध्यमातून प्रा. तुकाराम पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू विशद केले. आय. के. शेख, सविता इंगळे, नीलेश शेंबेकर, जयश्री श्रीखंडे, आनंद मुळूक, सुभाष चटणे, राजेंद्र पगारे यांनी शुभेच्छा दिल्या.

मुरलीधर दळवी, डॉ. श्रीश पाटील, शरद काणेकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री गुमास्ते यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *