पिंपरी (दिनांक : १८ डिसेंबर २०२३) मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात ‘जागर मानवी हक्काचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस तक्रार प्राधिकरण अध्यक्ष आर. व्ही. जटाळे, अॅड. असीम सरोदे, न्यायाधीश सोनल पाटील, जीएसटी आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर, समाजकल्याण विभागाचे साहाय्यक आयुक्त संतोष जाधव, दैनिक ‘आजका आनंद’चे संपादक शाम आगरवाल, तहसीलदार मदन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीश आर. व्ही. जटाळे म्हणाले, “मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पिंपरी – चिंचवड शहरात दिलासा संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण काम करीत आहे. या संस्थेच्या कामाला अधिक स्फूर्तिबळ अन् प्रेरणादायी ऊर्जा मिळावी या हेतूने हा पुरस्कार देताना आनंद वाटत आहे!”

स्मृतिचिन्ह, संविधान ग्रंथ देऊन न्यायाधीश सोनल पाटील यांच्या हस्ते संस्थेला सन्मानित करण्यात आले. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, अशोक गोरे, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, फुलवती जगताप, जयश्री गुमास्ते, शरद शेजवळ,मीना करंजावणे, आण्णा जोगदंड यांनी सन्मान स्वीकारला.
यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले, “हा सन्मान दिलासा संस्थेच्या कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांचे बहुमोल योगदान आज २४ वर्षे मिळत आहे म्हणूनच दिलासा संस्था एड्स जनजागृती, पर्यावरण संवर्धन, साहित्य अन् सांस्कृतिक क्षेत्रात खारूताई इतके काम करू शकली. संस्थेला मिळालेला हा सन्मान दिलासा देणारा आहे.”

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, गजानन धाराशिवकर, संगीता जोगदंड यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *