– मोशी शिवरस्ता रस्त्याचे भूमिपूजन
– आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
पिंपरी । प्रतिनिधी
तळवडे ते मोशी रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोशी शिवरस्ता ते पुणे-नाशिक महामार्गापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असा शब्द स्थानिक नागरिक आणि सोसायटी धारकांना दिला होता. महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण होईल. त्यामुळे औद्योगिक पट्टयासह निवासी क्षेत्रातील नागरिक, वाहनचालकांना ‘ट्रॅफिकमुक्त’ प्रवास करता येईल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
मोशी येथे आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते प्रस्तावित रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव, उद्योजक संतोष बारणे, निलेश बोराटे, निखिल बोऱ्हाडे, संतोष जाधव, सागर हिंगणे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, नागरिक आणि सोसायटीधारक उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य विभागाकडून प्रभाग क्रमांक २ मोशी गट नं. १२५२ शिवरस्ता ते गट नं. ७५२ (पुणे नाशिक हायवे) पर्यंतच्या ३० मीटर रुंद डी.पी. रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. मोशी ते देहू फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या होती. त्यामुळे हा रस्ता विकसित करण्याची आवश्यकता होती.
****
शेतकरी, सोसायटीधारकांना दिलासा : माजी महापौर राहुल जाधव
माजी महापौर राहुल जाधव म्हणाले की, मोशी शिवरस्ता ते पुणे-नाशिक महामार्गापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण केल्यामुळे मोशी ते देहू फाटाहून चिखलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना होणारी वाहतूक कोंडीची त्रास कमी होईल. दळणवळण वाढणार असून स्थानिक शेतकरी आणि सोसायटीधारकांनाही रस्ता उपलब्ध होणार आहे. तसेच, चिखली-हवालदार वस्तीमार्गे आखणी एक नवीन रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात हा रस्ता चिखली-मोशी रस्त्याला समांतर रस्ता म्हणून उपयोगात येईल.