पिंपरी (दिनांक : १३ नोव्हेंबर २०२३):-
“ऐकायची नसते कविता
साठवायची असते कविता
सांगायची नसते कविता
जगायची असते कविता!”
कवितेवर चपखल भाष्य करणारी अशी आशयसंपन्न कविता शिवांजली साहित्य परिषदेचे संस्थापक – अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी चाळक यांनी हुतात्मा चापेकर सार्वजनिक वाचनालय, चापेकर चौक, चिंचवड येथे सोमवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ रोजी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सादर केली. शब्दधन काव्यमंच आयोजित साहित्यविश्वात अतिशय अनोख्या असलेल्या ‘दिवाळी माध्यान्ह’ या पुस्तकांच्या सान्निध्यात संपन्न झालेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षीय मनोगतातून शिवाजी चाळक बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश लुणावत, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ग्रंथपाल कांचन कोपर्डे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रदीप गांधलीकर यांनी आपल्या मनोगतातून, “मानवी जीवनात अन् संस्कृतीत कवितेचे स्थान अनन्यसाधारण आहे. जगातील वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतीतील धर्मग्रंथ हे काव्यस्वरूपात आहेत; तसेच माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपश्चातही विविध टप्प्यांवर कविता साथ देत असते!” असे विचार मांडले. सुरेश लुणावत यांनी, “कविता समाज जोडण्याचे महत्त्वाचे काम सहजपणे करीत असते!” असे मत व्यक्त केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध कवी कुंजविहारी यांची कविता सादर केली. मान्यवरांच्या हस्ते ग्रंथांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांनी शब्दधन काव्यमंचाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली; तर प्रकाशक नितीन हिरवे यांनी काव्यमंचाच्या साहित्यिकांनी साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर ऊहापोह केला.

‘दिवाळी माध्यान्ह’ या वैशिष्ट्यपूर्ण कविसंमेलनात सुहास घुमरे, जयवंत पवार, आत्माराम हारे, आय. के. शेख, अण्णा जोगदंड, अशोक कोठारी, अरुण कांबळे, जयश्री गुमास्ते, कैलास भैरट, आनंद मुळूक, रघुनाथ पाटील, सां. रा. वाठारकर, संगीता सलवाजी, फुलवती जगताप, हेमंत जोशी, जगदीप वनशिव, सविता इंगळे, विलास कुंभार, शोभा जोशी, वर्षा बालगोपाल, श्यामला पंडित, योगिता कोठेकर, सुरेश कंक या कवींनी वैविध्यपूर्ण आशयविषयांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उत्कृष्ट अन् आशयसंपन्न कवितांच्या सादरीकरणासाठी सुरेश लुणावत यांनी पाच कवींना उत्स्फूर्तपणे रोख बक्षिसे दिली.

शरद काणेकर, अशोकमहाराज गोरे, मुरलीधर दळवी, प्रफुल्ल कुंभार यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *