पिंपरी (दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२३) ‘फ… फ… फटाक्याचा अन् प्र… प्र… प्रदूषणाचा!’ या पथनाट्याच्या प्रभावी सादरीकरणातून राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव येथे रविवार, दिनांक ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०८:०० वाजता दिलासा संस्था, कलारंजन प्रतिष्ठान, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या तीन संस्थांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी नागरिकांचे प्रबोधन केले. याप्रसंगी वृक्षमित्र अरुण पवार, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर, तानाजी एकोंडे, कलारंजनचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, दिलासाचे अध्यक्ष सुरेश कंक आणि मानवी हक्क संरक्षणचे अध्यक्ष अण्णा जोगदंड यांच्यासह साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
‘फ… फ… फटाक्याचा अन् प्र… प्र… प्रदूषणाचा!’ या पथनाट्यात संजना करंजावणे, अण्णा जोगदंड, शामराव सरकाळे, सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी, नंदकुमार कांबळे, श्रावणी अडागळे, सारंगी करंजावणे, सुरेश कंक यांनी सहभाग घेऊन फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी नाट्यपूर्ण प्रसंगांचे सादरीकरण करून उद्बोधक माहिती दिली. फटाक्यांमध्ये असलेल्या कॅडमियम, पोटॅशियम, सल्फर यासारख्या विषारी रसायनांच्या ज्वलनामुळे अनेक घातक वायूंचे उत्सर्जन होते. त्यामुळे गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्वांना श्वसनविकार, कर्णबधिरत्व, हृदयविकार अशा अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक विकारांचा प्रादुर्भाव होतो; याशिवाय अपघातांचा धोका बळावतो, याविषयी प्रबोधन करण्यात आले.
यावेळी श्रीकांत चौगुले यांनी, “दिवाळी हा आनंदाचा सर्वात मोठा सण असल्याने पारंपरिक प्रतीकांच्या माध्यमातून तो साजरा केला जात असताना फटाक्यांना त्यात स्थान नसावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. अरुण पवार यांनी, “समाज परिवर्तन हे एका दिवसात घडत नाही. त्यामुळे पथनाट्यासारखे प्रबोधनाचे माध्यम परिणामकारक ठरते!” असे मत व्यक्त केले. यावेळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची सामुदायिक शपथ घेण्यात आली त्यामध्ये आत्माराम हारे, रेखा सातोकर, तुळशीराम जगदाळे, उमा मोटेगावकर, गणेश वाडेकर, विजया नागटिळक, संजय गमे, जयश्री गुमास्ते, वामन भरगंडे, बाळासाहेब साळुंके, दिनेश घोगरे, योगिता कोठेकर, नीलेश हंचाटे, सागर जाधव, सूर्यकांत तिकोणे, अंकुश जाधव यांनी सहभाग घेतला. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.