– केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे मत
– श्रीक्षेत्र आळंदी येथे भाजपाची जाहीर सभा

श्रीक्षेत्र आळंदी :- केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिका, चीनसह परदेशात मोदींचा करिष्मा निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष भारताच्या लोकशाहीचे कौतूक करतात. मात्र, काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारताची लोकशाही धोक्यात आहे, असे परदेशात सांगतात. त्यामुळे विरोधकांची खोड जाणार नाही. पण, देशातील शेतकरी, दिनदुबळे, सर्वसामान्य नागरिकांसाठी समर्पित सरकार आहे, अशी घोषणा २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केली. त्यानुसार गेल्या ९ वर्षांत लोकहितासाठी केंद्र सरकार काम करीत आहे, असे मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दावने यांनी व्यक्त केले.

श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे शिरुर लोकसभा मतदार संघातील ‘‘मोदी@9 महा-जनसंपर्क अभियान’’ अंतर्गत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर, समन्वयक ॲड. धर्मेंद्र खांडरे, विस्तारक श्रीकृष्ण देशमुख, विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख, प्रदीप कंद, आशा बुचके, जयश्री पालांडे, योगेश टिळेकर, विकास डोळस, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील, सरचिटणीस विजय फुगे यांच्यासह खेड, जुन्नर, आंबेगाव, मंचर, हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे कोविडच्या महामारीत जगभरातील देशांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असतानाही मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी भारतात राहीले. कोविड प्रतिबंधक लस निर्माण करुन संपूर्ण जगाला लस पुरवठा केला आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस उपलब्ध केली. देशातील ८० कोटी लोकांना धान्य उपलब्घ केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदी १३ वर्षे काम केले. देशात ‘गरिबी हटाओ’ असा नारा दिला. मात्र, गरिबी हटली नाही. मोदी सरकारच्या काळात गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना हाती घेण्यात आल्या.
यावेळी आळंदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सोमनाथ वाहिले यांनी भाजपात प्रवेश केला.
*****

कोविड लस घेतलेला प्रत्येक नागरिक ‘लाभार्थी’ : आमदार लांडगे
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत केलेली विकासकामे आणि कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. भाजपाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होत आहे, याची प्रचिती ‘मोदी@9 महा-जनसंपर्क अभियान’ दरम्यान येत आहे. कोविड महामारीमध्ये मोफत लस दिल्यामुळे नागरिकांमध्ये मोदी सरकारने ‘संजीवनी’ दिल्याची भावना निर्माण झाली आहे. ज्या भारतीय नागरिकाने कोविड लस घेतली आहे. तो प्रत्येक व्यक्ती मोदी सरकारच्या चांगल्या निर्णयांचा लाभार्थी आहे, असा विश्वासही लांडगे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *