पिंपरी (दिनांक : १४ मार्च २०२३):- दुर्धर आजाराने व्याधीग्रस्त असूनही जिद्दीने घरकाम आणि मोलमजुरी करून प्रपंच चालविणाऱ्या महिलांना जागृत नागरिक महासंघ (माहिती अधिकार प्रचार, प्रसार आणि प्रशिक्षण समिती महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या वतीने संसारोपयोगी किराणा साहित्याचे वितरण तसेच पालक गमावलेल्या अठरा वर्षे वयाखालील मुलांना पौष्टिक आहार (न्युट्रिशन किट) पाकिटांचे वाटप करण्यात आले. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून सोमवार, दिनांक १३ मार्च २०२३ रोजी सावित्रीबाई फुले सभागृह, डॉ. आंबेडकर पुतळ्यामागे, पिंपरी चौक येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा तीस महिला आणि वीस लहान मुलांनी लाभ घेतला. पिंपरी-चिंचवड महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष नितीन यादव, उपाध्यक्ष राजेश्वर विश्वकर्मा, खजिनदार रोहिणी यादव, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अशोक कोकणे, प्रकाश पाटील, दत्तात्रय काजळे, नीलिमा भागवत, राजश्री शिर्के यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच सभागृहात जागृत नागरिक महासंघ जेजुरी विभागप्रमुख किशोर खोमणे, मावळ येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश लालगुडे, माहिती अधिकार कार्यकर्ते नवनाथ खोमणे, गिरीश झगडे आदींची उपस्थिती होती. प्रफुल्ल पुराणिक यांनी आपल्या मनोगतातून, “माणूस जन्माला येताना एकटा असतो; पण जग सोडून जाताना समाजाचे देणे फेडून गेल्यास आपल्या जन्माचे सार्थक करतो. महाराष्ट्रभर कार्यरत असणारी जागृत नागरिक महासंघ ही संस्था असे सेवाभावी कार्यकर्ते घडविते!” असे गौरवोद्गार काढले.‌ नितीन यादव यांनी प्रास्ताविकातून, “सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने २०१६मध्ये जागृत नागरिक महासंघाची स्थापना करण्यात आली. माहिती अधिकार कायद्याचा शंभर टक्के सकारात्मक वापर करून महाराष्ट्रात शासन मान्यताप्राप्त वीस शाखा आणि अडीचशे समर्पित कार्यकर्ते यांच्या बळावर माहिती अधिकार कायद्याचा प्रचार, प्रसार आणि प्रशिक्षण देत समाजोपयोगी विधायक कार्यासाठी संस्था कार्यरत आहे!” अशी माहिती देताना सर्वसामान्य जनतेसाठी संस्थेने केलेल्या विविध कामांची उदाहरणे दिलीत. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आशा घोडके आणि सुरेखा रणदिवे यांनी महासंघाच्या जनहिताविषयी कार्याचे स्वानुभव कथन केले. महिलादिनाच्या औचित्यामुळे उपस्थित महिलांनी हळदीकुंकू समारंभ साजरा करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. सतीश घावटेमर्दान, दत्तात्रय देवकर, मच्छिंद्र कदम, प्रकाश गडवे यांनी संयोजनात सहकार्य केले. राजाराम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. महासंघाचे सचिव उमेश सणस यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *