पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीला दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे दुःखाची झालर होती. या पोटनिवडणुकीत महायुतीने परीक्षा दिली. आता महापालिका निवडणुकीत अब की बार १०० नगरसेवक हे टार्गेट पूर्ण करायचे आहे. महापालिकेवर पुन्हा आपलाच झेंडा फडकवायचा आहे, असा निर्धार नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला. तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामुळे पोटनिवडणुकीतील विजय सुकर झाल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा दणदणीत विजय झाला. त्याबद्दल सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानण्यासाठी राहटणी येथील विमल गार्डनमध्ये रविवारी मेळावा झाला. त्यावेळी नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप बोलत होत्या. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, भाजपचे चिंचवड विधानसभा प्रभारी संतोष कलाटे, शहर सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, महिला आघाडी शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, माजी महापौर माई ढोरे, उपमहापौर झामाबाई बारणे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष अमोल पवार, प्रहारचे शहराध्यक्ष संजय गायखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, “दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतर अवघ्या २१ दिवसांतच पोटनिवडणूक लागली. त्यामुळे पोटनिवडणुकाला सामोरे जाणे जड गेले होते. पण सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी निवडणुकीची सर्व धुरा पेलली. सर्वांच्या आशिर्वादामुळे घराबाहेर पाऊल टाकून निवडणुकीला मी उभी राहिले. सर्वांनी लक्ष्मणभाऊंची कमी जाणवू दिली नाही. कुटुंबाचीही मला तितकीच साथ मिळाली. आभार परक्यांचे मानायचे असतात. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते माझ्या घरातीलच आहेत. प्रत्येकजण मीच अश्विनी लक्ष्मण जगताप समजून झटत होता. प्रचार करत होता. सर्वजण अक्षरशः पायाला भिंगरी लावून पळत होते. मी आमदार झाल्यानंतर विधीमंडळात शपथ घेताना माझ्या पतीचे नामस्मरण केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आले. पोटनिवडणूक रंगीत तालीम झाली. त्याला दुःखाची झालर होती. पोटनिवडणुकीने आपली परीक्षा पाहिली. आता अब की बार १०० चे टार्गेट पूर्ण करायचे आहे. आतापासूनच तयारीला लागा. पुन्हा आपलाच झेंडा महापालिकेवर फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे चांगले काम केले. बोलायचे एक करायचे एक असे काम केले नाही. कार्यकर्त्याचा प्रामाणिकपणा जनतेपुढे येतो. पोटनिवडणुकीत आपले काही हक्काचे मतदार बाहेर पडले नाहीत. ते बाहेर पडले असते तर अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा ५० हजाराच्या मताधिक्याने विजय झाला असता. आता यापुढील प्रत्येक निवडणुकीत मतदार बाहेर काढायला हवा.”

आमदार उमा खापरे म्हणाल्या, “प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोख पार पाडल्यामुळे आज आपल्या वहिनी आमदार झाल्या. महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवडची निवडणूक समजूनच पोटनिवडणूक पार पाडली. आता महापालिका निवडणूक लढवणाऱ्यांनी निवडून येण्यासाठी आपापल्या प्रभागात कामाला सुरूवात करावे. ज्या प्रभागात कमी मतदान झाले आहे, तेथे कष्ट करावे. महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. महापालिका निवडणुकीत सर्वांनी मिळून १०० चा आकडा पार करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.”

शंकर जगताप म्हणाले, “पोटनिवडणुकीत भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची उणीव जाणवू दिली नाही. ते लक्ष्मणभाऊंप्रमाणेच सर्व कार्यकर्त्यांना बळ देऊन काम करून घ्यायचे. खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे यांनीही मोठी साथ दिली. येथील जनतेने व कार्यकर्त्यांनी ३०-३५ वर्षे भाऊंवर प्रेम केले. तेच प्रेम, तोच जिव्हाळा या पोटनिवडणुकीत दिसून आला. पण पोटनिवडणुकीची संधी साधून काही अल्पसंतुष्ट लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचे काम केले. दुःखाच्या प्रसंगात परकीयांसोबत स्वकीयांनीही आमच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असे दुःख दुश्मनावरही येऊ नये. राजकीय इच्छा कधी प्रकट करायची तेवढे ज्ञान व भान सर्वांना असले पाहिजे. विघ्नसंतुष्ट लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचे जेवढे प्रयत्न केले तेवढे आमचे कुटुंब एक आणि घट्ट झाले. त्यामुळे त्या विघ्नसंतुष्ट लोकांचेही मी आभार मानतो. ज्ञात, अज्ञात सर्वांनी पोटनिवडणुकीत खूप काम केले. त्या सर्वांचे मी आभार मानतो. आताच्या यशाने हुरळून न जाता महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे गांभीर्य ओळखून काम करावे लागणार आहे. पोटनिवडणुकीत चिंचवड मतदारसंघातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *