पिंपरी (दिनांक : १२ मार्च २०२३):- “स्वकर्तृत्वामुळे महिला सन्मानास पात्र आहेत! केवळ एक दिवसच नव्हे तर प्रत्येक दिवस त्यांचा सन्मान व्हायला हवा!” असे विचार नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनी विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक ११ मार्च २०२३ रोजी व्यक्त केले.

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेच्या वतीने अध्यात्म आणि समाजप्रबोधन या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुवर्णरेखा इतराज, शुभदा सोमण आणि ज्योती वाडेकर यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विधानपरिषद आमदार उमा खापरे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, प्रा. माधुरी गुरव, ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी यांची याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

“भारतीय कुटुंबसंस्था भक्कम असल्याने पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाचे भय बाळगण्याचे कारण नाही!” असे मत उमा खापरे यांनी मनोगतातून मांडले. दीपप्रज्वलन, गणेश प्रतिमापूजन तसेच रत्नप्रभा खोत आणि मंगला दळवी यांनी केलेल्या त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अध्यक्ष रमेश इनामदार यांनी आपल्या प्रास्ताविकातून, “अतिप्राचीन काळापासून महिलांनी आपल्या कार्याचा ठसा समाजमनावर उमटवला आहे!” असे गौरवोद्गार काढले. गोपाळ भसे यांनी मानपत्राचे वाचन केले. दिलीप तांबोळकर यांनी सत्कार प्रसंगी मंगलमय शंखनाद केला. मोरेश्वर शेडगे आणि अश्विनी चिंचवडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले; तर सत्कारार्थींनी कृतज्ञतापर मनोगते व्यक्त केलीत. यावेळी कार्यकारिणीतील उषा गर्भे, रत्नप्रभा खोत आणि मंगला दळवी यांना आमदारांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले; तसेच अश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते सभासद महिलांना भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विरंगुळा केंद्रातील सफाई कामगार संगीता जगताप यांचाही सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड कार्यकारिणीने संयोजनात परिश्रम घेतले. उषा गर्भे यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष अरविंद जोशी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *