पिंपरी, दि. १४ – वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांचे तातडीने फायर ऑडिट करण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना त्याबाबातचे लेखी निवेदन त्यांनी दिले.

आपल्या निवेदनास सौ. सावळे म्हणतात, मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. अशा स्थितीत आगीच्या घटनांचे प्रमाण अधिक वाढते. मागील काही वर्षात आगीच्या अनेक गंभीर घटना पिंपरी चिंचवड शहरासह राज्यात व देशभरात घडल्या आहेत. या आगीच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे.
कोरोनाकाळात खासगी व शासकीय रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या.

भंडारा जिल्ह्यात १० नवजात अर्भके मृत्युमुखी पडल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली होती. तसेच मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयाच्या आय.सि.यु. कक्षात आग लागून रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात आगीच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ हे ६ डिसेंबर २००८ नुसार दर सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यात अग्नी प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत असल्याचा दाखला (फायर ऑडिट) मिळविणे बंधनकारक केले असल्याचे सिमा सावळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

आगामी दोन महिन्यांमध्ये उन्हाळी ऋतू आहे. तरी वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांमध्ये आगीच्या घटनांचा मुकाबला करण्यासाठी विविध आस्थापनांनी लावलेले फायर एक्सटिंगग्वीशर रिकामे अथवा अपुरे आहेत का? आग लागल्यास काळजी घेणारे सेफ्टी फलक, अग्निचे माहिती देणारे अॉटोमेटेड फायर अलॉर्म सिस्टम इत्यादी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित आहेत का ? याबाबतचे फायर ऑडिट तातडीने करण्यात यावे. तसेच अग्निशमन दलाच्या वतीने काही प्रमुख ठिकाणी माॅक ड्रील देखील करण्यात यावे, अशी सुचना देखील सावळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *