पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील एक वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरु आहे. या प्रशासकीय राजवटीत देखील महापालिकेतील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता राजकीय दबावापोटी मुस्लिम कुटूंबियावर अन्याय करु लागले आहेत. गेली तीन वर्षापासून अधिकृतपणे नळ कनेक्शन देवून पाणी देण्याची वारंवार मागणी केली जात होती. मात्र, भाजपच्या एका माजी महापाैरांच्या दबावापोटी पाण्यापासून शेकडो कुटूंबियाना वंचित ठेवण्याचे काम कनिष्ठ उपअभियंता करत आहेत. प्रशासकीय राजवटीत तरीही पाणी मिळेल म्हणून नळ कनेक्शन देण्याचा रितसर अर्ज दिला, त्यानंतर तब्बल तीन आठवड्यानंतर पाईपलाईनसाठी चारी खोदण्याचे काम सुरु केले. पण भाजपच्या एका माजी महापौराच्या दबावापोटी काम बंद करुन खोदलेली चारी पुन्हा बुजवून टाकण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत एका माजी महापाैराची दादागिरी सुरु असून शेकडो कुटूंबियाना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात चिखलीच्या चौधरी वजनकाटा या ठिकाणी शेकडो मुस्लिम कुटूंबिय वास्तव्यास आहेत. तेथील चौधरी वस्तीतील 135 कुटुंबियाना महापालिकेचे पाणी मिळावे म्हणून कित्येक वर्ष प्रयत्न सुरु आहे. मात्र, त्या शेकडो मुस्लिम कुटुंबियाना आजतागायत पालिकेचे पाणी मिळू नये म्हणून पाणी पुरवठ्याचा कनिष्ठ अभियंता, उपअभियंता हे राजकीय दबावाखाली येवून पाण्यापासून वंचित ठेवत आहेत. वारंवार अर्ज करुन त्यांच्या अर्जाला केराची टोपली दाखविली जात आहे.
चिखलीतील चौधरी वस्तीत 135 मुस्लिम कुटुंब राहतात. सध्या त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पुरेसा पिण्यासाठी पाणी पुरवठा होत नसल्यामुळे कायमस्वरुपी पाईपलाईन टाकून प्रत्येक घराला स्वतंत्र नळजोड देण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले. सध्यस्थितीत महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्यामुळे चौधरी कुटूंबियाच्या वतीने एकत्रितपणे 130 नळ कनेक्शन मिळावे म्हणून रितसर महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज केला. सर्व कागदपत्राची तपासणी केल्यानंतर नळ कनेक्शन देण्यास मंजूरी देण्यात आली. त्यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांची भेट देऊन पाईपलाईन भूमीगत करण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावर पाणी पुरवठा विभागाकडून चौधरी वस्तीसाठी नवीन पाईपलाईन भूमीगत करण्याचे काम हाती घेण्यात आले.
पाईपलाईन टाकण्यासाठी चारी खोदण्याचे काम सुरु असताना भाजपच्या एका माजी महापौराने हे खोदकाम अडवले आहे. संबंधित कनिष्ठ अभियंत्याला सांगून जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत हे काम करायचे नाही, असा दम भरला. त्यावर पाईपलाईनसाठी खोदलेली चारी देखील त्या अधिका-यांना बुजवून टाकली आहे. याबाबत चौधरी कुटूंबियानी वरिष्ठ अधिका-यांना कळविले, त्या अधिका-यांची याबाबत तक्रार केली. अधिका-यांनी देखील राजकीय दबावाखाली येऊन हे काम पुन्हा सुरु करण्यास नकार दिला. जोपर्यंत माजी महापौर सांगत नाहीत, तोपर्यंत हे काम करता येणार नसल्याचे सांगत पाणी पुरवठा विभागातील उप अभियंत्याने माघार घेतली. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी नळजोड देण्याची रितसर मागणी करणा-या चौधरी वस्तीतील 135 कुटुंबियांवर अन्याय सहन करण्याची वेळ आली आहे. राजकीय दबावापोटी चिखलीतील चौधरी वस्तीत 135 कुटुंबियांना नळ जोड देण्याचे काम महापालिकेने थांबविले आहे. एका माजी महापाैराच्या दबावामुळे नळजोड देण्यासाठी केलेले खोदकाम त्वरीत बुजविण्यात आले आहे. आता माजी महापाैराच्या शिफारस केल्यानंतरच नळ जोड दिले जाईल, असे त्या मुस्लिम कुटूंबियाना संबंधित अधिका-यांनी स्पष्ट सांगितले आहे.
आमच्यावर अन्याय होतोय..
महापालिकेकडे रितसर अर्ज करुन 130 नळ कनेक्शन द्यावे अशी मागणी केली. आमच्या कागदपत्राची पुर्ण तपासणी करुनच त्यांनी नळ कनेक्शन देण्यास मंजुरी दिली. जागा ताब्यात नाही म्हटल्यावर प्रतिज्ञापत्र देवून ना-हरकत दिली. तसेच चारी खोदाई आणि पाईपलाईनचा सर्व खर्च आम्ही स्वता: करीत आहोत. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. पण संबंधित अधिका-याने एका राजकीय नेत्याच्या सांगण्यावरुन काम थांबविले. तसेच त्या राजकीय नेत्याला जावून अगोदर भेटा, मगच तुमचे काम सुरु करतो, असे तो अधिकारी सांगत आहे. महानगरपालिका कित्येक वर्ष आमच्याकडे कर घेत आहे. पण पाणी देत नाही. अधिका-यांना रितसर अर्ज देवूनही राजकीय नेत्यांच्या घराचे उंबरे झिजवायला सांगत आहे. त्यांची परवानगी आणा, मगच पाणी देतो, असे सांगून अधिका-यांनी पाईपलाईनसाठी खोदलेली चारी देखील बूजवून टाकली आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी आणि राजकीय नेते शेकडो मुस्लिम कुटूंबियाना पाणी देण्यापासून वंचित ठेवू लागले आहेत.
-इरफान चौधरी, तक्रारदार
————————————
.. तर आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन
करदात्या प्रत्येक नागरिकाला पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे हे महापालिकेचे पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे चिखलीतील 135 चौधरी वस्तीतील मुस्लिम कुटूंबियाकडून महापालिकेला लाखो रुपये कर दिला जातो. तर त्यांना पाणी देणे हे महापालिकेचे प्रथम कर्तव्य आहे. चौधरी वस्तीतील नागरिकांनी रितसर अर्ज करुन नळ कनेक्शन देण्याची मागणी केली. त्यानुसार पाणी पुरवठा लाईन भूमिगत करण्यासाठी खोदकाम केले. मात्र, एका महापाैराच्या राजकीय दबावाखाली येऊन महापालिकेने अशा पध्दतीने काम थांबवणे योग्य नाही. यामुळे राजकीय व्यक्ती व अधिकारी यांच्यात मिलिभगत असल्याचा संशय येतोय. याबाबत संबंधित पाणी पुरवठ्याचे कनिष्ठ व उपअभियंता यांच्या कडक कारवाई करावी आणि त्या मुस्लिम कुटूंबियाना पाणी देण्यात यावे, अशी तक्रार आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे करणार आहे. याकरिता आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन देखील करण्याची वेळ आली तर करणार आहे.