पिंपरी दि 14 प्रतिनिधी :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना मतदारांची वाढती सहानुभूती दिसून येत आहे. काल मतदार संघातील विविध भागात मतदारांशी त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी अनेकांनी स्वतः त्यांची भेट घेऊन आम्ही आपल्यासारख्या युवा नेतृत्वाकडे अपेक्षेने पाहत असल्याचे सांगितले.
चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून शिट्टी या चिन्हावर रिंगणात उडी घेतली आहे. सोमवारी त्यांनी श्री गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधत सांगवी येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर सांगवी, रहाटणी, रावेत, चिंचवडगाव, काळेवाडी फाटा, वाल्हेकरवाडी आदी भागात मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या. त्यांना युवक आणि महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले. चिंचवड गावातील दर्शन हॉल, तानाजी नगर भागात अनेकांनी स्वतः या प्रचार दौऱ्यादरम्यान राहुल कलाटे यांची भेट घेतली. आपल्यासारख्या युवा नेतृत्वाकडे आम्ही मोठे अपेक्षेने पाहत आहोत अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. विधानसभा निवडणुकीत दोन वेळा लक्षणीय मते घेतल्याने यावेळी कलाटे यांना सहानुभूती मिळणार असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले.
चिंचवड विधानसभा क्षेत्राच्या परिवर्तनाची कास धरून परिसरातील सर्व नागरिकांना एकत्र करून एक नवा इतिहास घडवण्याचे व्रत हाती घेतले आहे. केवळ जनतेच्या विश्वासावर तिसऱ्यांदा हे धाडस मी करत असल्याचे कलाटे यांनी सांगितले.