पिंपरी ः- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज व औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मनोहर जांभेकर (वय ९२) यांचे आज (शनिवारी) वृद्धापकाळाने निधन झाले.
चिंचवडमधील पवनानगर भागात १९६० पासून ते रहात होते.पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरीच्या विकासाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. १९६३ मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील कारखानदारीला तांत्रिक व कुशल ज्ञान असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे,हे ओळखून त्यांनी औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था (ATSS) स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून शहरातील मोठमोठ्या कारखानदारांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुले या गावी १३ नोव्हेंबर १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला. बी काॅम झाल्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात उदर निर्वाहासाठी पाऊल टाकले.
भारत सरकारची एच ए, तसेच बकावुलफ,एसकेएफ, रस्टन या कंपन्यांची या शहरात तेव्हा सुरूवात झाली होती तर बजाज ॲटो कंपनीच्या उभारणीचे काम सुरू होते. येथे कुशल, तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांची निकड भासू शकते हे दूरदृष्टीने ओळखून त्यांनी औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेची चिंचवड स्टेशन येथे स्थापना केली. १९९० मध्ये उभारल्या गेलेल्या निगडी प्राधिकरणात सिटी प्राईड स्कूल या शैक्षणिक संस्थेचे देखील ते संस्थापक होते.
“आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ” शासनाने उभारावे,यासाठी ते प्रयत्नशील होते. ७ जानेवारी २०१६ रोजी पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाने त्यांचा सन्मान केला होता.
——–