विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार जाहीर…
पिंपरी, दि. 14- विनोदसम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील कलाकार प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांना जीनवगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. हा पुरस्कार विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठान व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे (मावळ) यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणार आहे. तसेच विनोदसम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी निमीत विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानचे उद्घाटन देखील यावेळी होणार आहे.
हा सोहळा शुक्रवारी म्हणजे 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता तळेगाव दाभाडे येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. 6 (गुलाबी शाळा) येथे पार पडणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, विशेष निमंत्रित म्हणून अभिनेत्री सविता मालपेकर, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, पिंपरी-चिंचवड अखिल भारतीय नराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रसिद्ध कीर्तनकार, ह. भ. प. पंकजमहाराज गावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य संचालक सांस्कृतिक कार्य संचलनालय बिभिषण चवरे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखळकर, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, लावणी कलावंत अर्चना जावळेकर व संगीता लाखे आदी उपस्थित असणार आहेत.
विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानच्या संचालक मंडळावर अध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठातील शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे, कार्याध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तळेगाव दाभाडे येथील अध्यक्ष यांची सुरेश धोत्रे, उपाध्यक्षपदी मुंबई विद्यापीठ लोककला अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे व सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, सचिवपदी साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, सहसचिवपदी साहित्यिक सोपान खुडे, खजिनदारपदी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अॅड. रंजना भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, विश्वस्त मंडळातील कांदबरीकार विश्वास पाटील, डॉ. भावार्थ देखणे, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर महाराव, खंडूराज गायकवाड, साहेबराव काशीद, दादु इंदुरीकर यांचे चिरंजीव राजेद्र सरोदे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रतिष्ठानच्या उद्घाटनानंतर उपस्थित प्रेक्षकांना रघुवीर खेडकर कांताबाई सातारकर व सहकारी यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा लावणीचा बहारदार कार्यक्रम पाहता येणार आहे. हे सादरीकरण शुक्रवारी (दि.16) सायंकाळी 6 नंतर होणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी नियोजनाचे काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे (मावळ) शाखेचे विश्वस्त सुरेश साखवळकर, संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, उपाध्यक्ष ब्रिजेंद्र किल्लावाला, प्रमुख कार्यवाहक हरिचंद्र गडसिंग, सचिव प्रसाद गुंगी, खजिनदार नितीन शहा व सह खजिनदार भरतकुमार छाजेड तसेच सर्व संचालक मंडळ व सभासद पहाणार आहेत.
विनोदसम्राट दादू इंदुरीकर यांच्या विषयी :-
विनोदसम्राट दादु इंदुरीकर यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत प्रबोधन व मनोरंजनाचे काम हे सलग पाच दशके केले आहे. त्यांच्या ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्याचे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर पन्नास हजारांहून अधिक प्रयोग झाले. हा विक्रम रंगभूमीतील एकाही कलावंताला अद्याप मोडता आलेला नाही. त्यांच्या लोकनाट्य, वगनाट्य व तमाशातील अनेक विनोदी भूमिका अजरामर ठरल्या. दादु इंदुरीकर यांना 1972 साली कलाक्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. त्यांच्या या लोककलेबद्दल अनेक मान्यवरांनी नावाजले तसेच त्यांना ‘महाराष्ट्राचे लॉरेल हार्डी’ म्हणूनही संबोधले गेले.
विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोकप्रतिष्ठान विषयी :-
या प्रतिष्ठानच्या वतीने राज्य पातळीवर लोककला विद्यापीठ स्थापन करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच लोककलेसाठी परिषद तसेच संमेलन भरवली जाणार आहेत, लोककलेचा जास्ती जास्त प्रसार या माध्यामातून केला जाणार आहे. लोककलावंत विशेषतः महिला कलांवतांसाठी सुख-सुविधा मिळवण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत. लोककलेचे संवर्धन व प्रसार व्हावा, यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. तसेच दादु इंदुरीकर जन्मशताब्दीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत विवध उपक्रम राबविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी संस्थेमार्फत शासनाकडे करण्यात येणार आहे.