पिंपळे गुरव:- अक्षरभारती पुणे -पिंपरी- चिंचवड संस्थेच्या वतीने साहित्य-कला- संवाद साहित्यिक उपक्रमाचे आयोजन गांगर्डेनगर पिंपळे गुरव येथे आयोजित केले होते. लेखक, अभिनेते,माध्यमतज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे प्रमुख अतिथी होते. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, लेखक शिवाजीराव शिर्के,महाराष्ट्र साहित्य परिषद, चिंचवडचे शाखाप्रमुख राजन लाखे, डॉ. शकुंतला काळे, विज्ञान लेखक डॉ. संजय ढोले,अनुवादक डॉ. गजानन चव्हाण, रत्ना चौधरी हे मान्यवर उपस्थित होते.
वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक अक्षरभारतीचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते अक्षरभारती माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. अक्षरभारतीचे कार्याध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी डॉ. मेहेंदळे म्हणाले–“लेखकांनी गुळमिळीत कागदावर लिहू नये.कृतीशील अन ठोस विचाराने लिहावे. माध्यमांचे माणसांना वेड लागले आहे.असंख्य कुटुंबे त्यात दंग आहेत.मग कुटुंबात कौटुंबिक सुख राहणार कां? हा प्रश्न आहे. सच्चेपणाने जगले तर जीवनात सर्व काही मिळते.फसवेगिरीने जीवन जगू नये. हल्ली अनेक वाहिन्यांवरून सातत्याने बातम्यांचा मारा होत आहे ब्रेकिंग न्यूज म्हणून. सकारात्मक उर्जा देणाऱ्या बातम्या कमी अन नकारात्मकता आधिक पहायला मिळत आहे.याला किती महत्व द्यायचे ते माणसांनी ठरवले पाहिजे”.
याप्रसंगी नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, लेखक, गझलकार प्रा. तुकाराम पाटील, सावित्रीच्या लेकींचा मंच, शब्दधनच्या मधूश्री ओव्हाळ, व्याख्यानमाला समन्वय समिती प्रमुख राजेंद्र घावटे, मुक्तपत्रकार प्रदीप गांधलीकर, नक्षत्राचे देणं काव्यमंचचे राजेंद्र सोनवणे, स्वानंद महिला प्रतिष्ठानच्या सुरेखा कटारिया, ज्येष्ठ साहित्यिक दिलीप गरुड, समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष कैलास भैरट या सर्व संस्थेच्या अध्यक्षांचा सन्मान डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिरीष पडवळ, धनश्री चौगुले , प्रतिभा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अक्षरभारतीचे पिंपरी चिंचवड प्रमुख सुरेश कंक यांनी केले तर आभार रुपाली अवचरे यांनी मानले.