चिंचवड:- शहरातील ३५ संस्थांच्या एकजुटीचे प्रतिबिंब असलेल्या साहित्य संवर्धन समिती पिंपरी चिंचवड शहर या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी, कथाकार, गझलकार, कवी नंदकुमार मुरडे यांना ‘साहित्यसाधक’ पुरस्कार देऊन चिंचवड गाव येथे प्रा.तुकाराम पाटील, संस्थेच्या कार्याध्यक्ष शोभा जोशी, कोषाध्यक्ष राज अहेरराव, साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, सचिव सुहास घुमरे, सविता इंगळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
नंदकुमार मुरडे बालपणी श्रीक्षेत्र आळंदी येथे राहात होते. त्यामुळे वारकरी सांप्रदायाचे सुसंस्कार त्यांच्या मन, बुद्धी अन आत्म्यावर कोरले गेले. शब्दांची फुले वेचित त्यांनी गेल्या चाळीस वर्षाहून आधिक काळ साहित्यसेवा केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पसायदान जीवनभर साहित्यिक वृत्तीतून अन कृतीतून अंगिकारत शहरातील सर्व साहित्यिक संस्थांच्या माध्यमातून आजही ते कार्यमग्न आहेत. साहित्यिकांचे प्रेरणाश्रोत असलेल्या नंदकुमार मुरडे यांनी जीवनभर साहित्य साधना केली आहे म्हणूनच त्यांना ‘साहित्यसाधक’ पुरस्कार देऊन गौरविताना साहित्यिकांना आनंद झाला.
याप्रसंगी श्रीकांत चौगुले, अशोक कोठारी, प्रदीप गांधलीकर, सुभाष चव्हाण, कैलास भैरट, तानाजी एकोंडे, मधूश्री ओव्हाळ, वर्षा बालगोपाल,रजनी अहेरराव, माधुरी विधाते,निशिकांत गुमास्ते,उज्वला केळकर, अशोक गोरे, राजू जाधव, जयश्री गुमास्ते,अंतरा देशपांडे, विजया नागटिळक, पंजाबराव मोंढे उपस्थित होते.