खासगी तेल कंपनी नयारा कडून विस्कळीत पुरवठ्यामुळे पेट्रोल पंप चालक संकटात…

दिनांक (दि.५ एप्रिल २०२२):- रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर रोजच वाढत आहे. केंद्र सरकार रोज इंधन दर वाढवत आहे. परिणामी नयारा (एस्सार) कंपनी देशभरातील त्यांच्या डिलर्सला पुरवठा कमी करीत आहेत. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून राज्यातील या कंपनीचे ७०० पेट्रोल पंप बंद आहेत. या खासगी पेट्रोल पंपांचा पुरवठा केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन सुरळीत करावा अन्यथा या व्यवसायावर अवलंबून असणा-या १ लाखापेक्षा जास्त नागरीकांना रोजगार गमवावा लागेल असे प्रतिपादन महापेट्रो डिलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश बाबर यांनी केले. पिंपरी येथे मंगळवारी (दि.५ एप्रिल) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्यभरातून आलेले पेट्रोल पंप डिलर्स उपस्थित होते. यामध्ये राजकुमार मोरे, रोहित जठाणी, आनंद मंगरुळे, महेश बुब, हेंमत वालेचा, रेपल श्रीधर, वरुण भुजबळ, शंकर डोंगरे, राहुल भोसले, रमेश गित्ते, उध्दव चिलवंत, अनिल वाळके, सौरभ पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी योगेश बाबर यांनी सांगितले की, कच्चा तेलाच्या रोज वाढणा-या किमतीमुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता खाजगी तेल कंपनी नयारा एस्सार यांच्याकडून त्यांच्या पेट्रोल पंप डिलर्स ना गेल्या १० दिवसांपासून आगाऊ रक्कम घेऊन देखील कमी प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल पुरविण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ७०० आणि देशभरातील ५००० पेक्षा जास्त पंप गेल्या ८ दिवसांपासून बंद आहेत. नयारा एस्सार कंपनी कडून जाणीवपूर्वक पुरवठा कमी करण्यात आल्यामुळे आम्ही सर्व पेट्रोल पंप डिलर्सचे अतोनात नुकसान होत आहे तसेच ग्राहकांची देखील गैरसोय होत आहे. जोपर्यंत केंद्र शासन पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी २५ रुपयांनी वाढवत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत राहिल असे कंपनी कडून सर्व डिलर्सला कळविण्यात येत आहे. केंद्र सरकार इंधनाचे दररोज ४० ते ८० पैसे दर वाढवीत आहे.
याचप्रमाणे दरवाढ होत राहिली तर पुढील दोन महिन्यात अशाच पद्तीने पेट्रोल, डिझेल पुरवठा करण्यात येईल असे नयारा कंपनीचे अधिकारी सांगत आहेत. नयारा कंपनीच्या या धोरणामुळे पेट्रोल पंप डिलर्स हवालदिल झाले असून, एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पेट्रोल पंप उभारण्यासाठी गुंतवणूक आणि आणखी एक कोटी रुपये खेळते भांडवल एवढी गुंतवणूक करुनही या डिलर्सला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे नुकसान सहन करुन व्यवसाय सुरु ठेवला आहे. आता बँकांचा तगादा आणि खेळत्या भांडवलासाठी चलन तुट, कामगारांचे पगार, कर्जाचे व्याज या कात्रित या कंपनीचे पंप डिलर्स सापडले आहेत. मात्र सरकारी तेल पुरवठा करणा-या कंपन्यांचे पेट्रोल पंप देशभर सुरळीत सुरु आहेत. किंमतीतील तफावतीमुळे त्यांचे होणारे आर्थिक नुकसान केंद्र सरकार सहन करीत आहे.

त्याचप्रमाणे या कंपन्यांच्या डिलर्सला देखील केंद्र सरकारने मदतीचा हात द्यावा असेही आवाहन महापेट्रो डिलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश बाबर यांनी केले. अशा मागणीचे निवेदन असोशीएशनच्या शिष्ट मंडळाने केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे. या विषयी केंद्रीय केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हस्तक्षेप करुन नयारा कंपनीच्या पेट्रोल पंप डिलर्सला दिलासा द्यावा अन्यथा महापेट्रो डिलर्स असोसिएशनचे महाराष्ट्रातील ७०० डिलर्स आपल्या कर्मचा-यांसह आंदोलन करतील असा इशारा महापेट्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.
————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *