पिंपरी (दिनांक : ०४ एप्रिल २०२२):- “निसर्ग हाच देव असे मानणारी आपली संस्कृती असताना जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाची फांदी तोडून पूजा करणे यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही! आपला देश हा फक्त बोलणाऱ्यांचा देश आहे. बोलण्यापेक्षा कृतीवर भर दिला पाहिजे किंबहुना व्यवस्थेविरोधात निर्भीड, मुद्देसूद बोलले पाहिजे!” असे विचार टीव्ही फेम साहित्यिक आणि निसर्गमित्र अरविंद जगताप यांनी कॅप्टन कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक ०३ एप्रिल २०२२ रोजी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय पर्यावरण जागृती वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण करताना प्रमुख पाहुणे म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ फेम अरविंद जगताप बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघचालक विनोद बन्सल, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नायर, निसर्गमित्र विभागाचे अध्यक्ष धनंजय शेडबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. युवापिढीमध्ये निसर्गाविषयी आवड आणि जागृती निर्माण व्हावी म्हणून राज्यस्तरीय पर्यावरण जागृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतून सुमारे दोनशे स्पर्धकांनी ध्वनिचित्रफितींच्या माध्यमातून सहभाग नोंदविला होता. त्यामधून प्रत्यक्ष सादरीकरणाच्या अंतिम फेरीसाठी अकरा स्पर्धकांना निवडण्यात आले होते. ‘जागतिक तापमानवाढ’ , ‘शाश्वत विकासासाठी जीवनपद्धती’ आणि ‘स्वच्छ नदी जबाबदारी कोणाची?’ या तीन विषयांवर अतिशय चुरशीच्या अन् अटीतटीच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतून आपले विचार प्रभावीपणे मांडले. अंतिम अकरा स्पर्धकांमध्ये दहा विद्यार्थिनींचा समावेश होता, ही विशेष उल्लेखनीय बाब होय. त्यापैकी जमसंडे, जिल्हा सिंधुदुर्ग येथील सायली रानडे (प्रथम), पिंपरी, जिल्हा सोलापूर येथील संतोष शिंदे (द्वितीय) आणि आरवली जिल्हा रत्नागिरी येथील समृद्धी रानडे (तृतीय) हे विजेते ठरले. विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम रुपये दहा हजार, पाच हजार, तीन हजार तसेच सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. याशिवाय सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि पर्यावरणपूरक सामुग्रीचे संच प्रदान करण्यात आले. प्रा. शैलजा सांगळे, प्रा.डॉ. अभय कुलकर्णी आणि रेवती दिंडी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. याप्रसंगी सागर नाझरकर यांनी संघाच्या पर्यावरण संरक्षण गतिविधीविषयी माहिती दिली; तसेच ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ , ‘जीवित नदी’ , ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ’ , ‘निसर्गमित्र विभाग’ आणि ‘सह्याद्री देवराई’ या ध्वनिचित्रफितींचे प्रदर्शन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. विनीत दाते आणि श्रीकांत मापारी यांनी सूत्रसंचालन केले. भास्कर रिकामे यांनी आभार मानले. पर्यावरणपूरक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *