प्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांच्या हस्ते गदिमा पारितोषिक स्वीकारताना कवी सुरेश कंक
पिंपरी :- गदिमांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, गदिमा कुटुंबीय आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २९ व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांना गदिमा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे उपस्थित होते.
गदिमा महाकवी आहेत.गदिमांनी लिहिलेले ‘गीतरामायण’ हा अनमोल ठेवा आहे असे भावोदगार डॉ. देखणे यांनी व्यक्त केले.
गदिमा स्नेहबंध पुरस्कार विचारवंत नंदकुमार मुरडे, गदिमा काव्यप्रतिभा पुरस्कार कवयित्री संगीता झिंजूरके, गदिमा साहित्य पुरस्कार प्रशांत केंजळे( नाशिक) शिवाजी चाळक ( पिंपळवंडी, जुन्नर) राजेंद्र उगले ( कोपरगाव) यांच्या कवितासंग्रहाना देण्यात आला.महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेच्या वतीने आयोजित काव्यस्पर्धेतील विजेते डॉ नीलम गायकवाड ( प्रथम क्रमांक) माधुरी ठाकूर ( द्वितीय) सुरेश कंक ( तृतीय) वर्षा बालगोपाल ( चतुर्थ) मीनाक्षी पाटोळे, शिल्पा जोशी( पाचवा क्रमांक) यांना श्रीधर फडके यांच्या हस्ते गदिमा पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रा मिलिंद जोशी म्हणाले– ‘गदिमांची शब्दफुले अमर आहेत.’ गदिमा आणि बाबूजी सुधीर फडके यांनी इतिहास घडवला. कुणी कणभर मदत केली तर गदिमा मणभर कृतज्ञता व्यक्त करीत असत.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र वाघ, मानसी चिटणीस यांनी विशेष परिश्रम घेतले. कवी उद्धव कानडे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले तर मुरलीधर साठे यांनी आभार मानले.