पिंपरी, 12 जुलै – पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई येथील प्रस्तावित बहुमजली पार्किंग तत्काळ विकसित करावी. नवीन प्लॅननुसार भाजी मार्केट बांधण्यात यावे. विक्रेत्यांच्या अडचणी सोडविण्यात याव्यात, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिका-यांना केल्या.
पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई येथील विविध समस्या तसेच मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्पातील प्रकल्पातील लाभधारकांना सदनिका वाटप आदी विषयांबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत बैठक घेतली. माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहर अभियंता राजन पाटील, नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, सह शहर अभियंता रामदास तांबे, मकरंद निकम श्रीकांत सवणे, सहाय्यक आयुक्त तथा झोनिपुचे सक्षम प्राधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, देवन्ना गट्टूवार, अनिल शिंदे, संजय खाबडे, अजय सूर्यवंशी, थॉमस नरोन्हा, उपअभियंता संजय खरात, शेखर गुरव आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई येथे बहुमजली पार्किंगचा प्लॅन केला आहे. पण, अद्यापर्यंत पार्किंग विकसित करण्यात आले नाही. भाजीपाला , फळे विक्रेत्यांना गाळे देण्यात येणार आहेत. पार्किंग लवकरात लवकर विकसित करावी. काही विक्रेते रस्त्यावर बसतात. त्यांचीही व्यवस्था करावी. मंडईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, साफसफाई तसेच मंडईची रंगरंगोटी करावीत. लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई असा एलईडी नामफलक लावण्यात यावा, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.
त्यावर लवकरच बहुमजली पार्किंगची निविदा काढली जाईल. नवीन प्लॅननुसार भाजी मार्केट बांधण्यात येईल असे आयुक्त पाटील यांनी सांगितले. तसेच मिलिंदनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील लाभधारकांना तातडीने सदनिका वाटप करण्याच्या सूचनाही खासदार बारणे यांनी यावेळी अधिका-यांना केल्या.