चिंचवडमध्ये २६ ऑगस्ट रोजी आयोजन; डॉ. गणेश शिंदे यांचे व्याख्यान, सौ. सन्मिता शिंदे यांचे गायन…

पिंपरी- प्रतिनिधी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने भक्तिरसपूर्ण ‘मोगरा फुलला’ या विशेष संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्य, अध्यात्म आणि भक्तिपरंपरेचा वेध घेणारे व्याख्यान डॉ. गणेश शिंदे यांचे होणार असून, प्रसिद्ध गायिका सौ. सन्मिता शिंदे यांच्या स्वरातून संत ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग व ओव्यांचा भक्तिरस रसिकांना अनुभवता येणार आहे.
‘मोगरा फुलला’ हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे अभंग, ओवी, अध्यात्मिक विचार आणि भक्तिपरंपरा संगीताच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविणारा विशेष सांस्कृतिक उपक्रम आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतमय साहित्याचा, त्यांच्या अध्यात्मिक विचारांचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा जागर या माध्यमातून करण्यात येणार आहे.

संत ज्ञानेश्वर माउलींच्या साहित्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाला समृद्ध दिशा दिली आहे. त्यांच्या अभंग-ओव्यांमधील भक्ती, ज्ञान, अध्यात्म आणि मानवतावादी विचार आजही समाजाला प्रेरणा देतात. या विचारांचा संगीत व व्याख्यानाच्या माध्यमातून जागर करण्याचा प्रयत्न ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

ज्ञानेश्वर माउलींच्या भक्तिरसात रसिकांना चिंब भिजविणारा हा सुरेल आणि अध्यात्मिक सोहळा पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक वैभवात निश्चितच मोलाची भर घालणारा ठरणार असून, शहरातील नागरिक व रसिकांसाठी हे एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरण्याची अपेक्षा संदीप वाघेरे यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *