चौघडा वादनातून शहराचा नावलौकिक वाढविणारे रमेश पाचंगे यांचा गौरव
पिंपरी, दि. १८ ऑगस्ट २०२६ : पारंपरिक चौघडा वादनाच्या सुरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दापोडी येथील प्रसिद्ध चौघडा वादक रमेश पाचंगे यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाविष्कारातून पाचंगे यांनी पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली आहे.
चौघड्याच्या पारंपरिक तालाला आधुनिक व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देत पाचंगे यांनी विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यांच्या प्रभावी चौघडा वादनाने देश-विदेशातील रसिकांची दाद मिळवली असून, त्यांच्या कलाप्रवासाची विविध पुरस्कारांनीही दखल घेण्यात आली आहे.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, चौघडा वादन ही केवळ कला नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा ठेवा आहे. ही कला सातासमुद्रापार पोहोचविण्याचे काम रमेश पाचंगे यांनी केले आहे. त्यांच्या कलेमुळे पिंपरी चिंचवड शहराची सांस्कृतिक ओळख देश-विदेशात पोहोचत आहे, ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे.
पारंपरिक कलांचा वारसा जपताना तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन आणि सन्मान मिळाल्यास या समृद्ध परंपरांना नवी ऊर्जा मिळते. रमेश पाचंगे यांच्यासारख्या कलाकारांच्या योगदानामुळे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी ओळख मिळत असल्याचेही बाबर यांनी यावेळी सांगितले.
