पिंपरी – संत तुकारामनगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देशभक्ती गीतावर नृत्य करून घोषणा देऊन ,लहान मुलांना खाऊ वाटप करुन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के म्हणाले की मी पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा साक्षीदार आहे. ते पुढे म्हणाले की पिंपरी चिंचवड औद्योगिक शहरात कामगार मंडळाने कामगार कवी संमेलन आपल्या शहरात घेतले पाहिजे ,कामगारांना बसमध्ये सवलत देऊन गुणवंत कामगारांसाठी लाडक्या बहिणी प्रमाणे लाडका गुणवंत कामगार म्हणून शासनाने पेन्शन दिली पाहिजे असे मत व्यक्त केले.
आण्णा जोगदंड म्हणाले की सध्या तरुणाई मोबाईलच्या व्यसनाधीन झाली आहे, मोबाईल मुळे त्यांच्यामध्ये पाश्चात्त्य संस्कृती रुजत चालली आहे हे धोकादायक आहे राष्ट्रीय सणासाठी शासनाने सुट्टी दिली असताना ध्वजारोहणास उपस्थित न राहता भटकंती करण्यात तरुणाईला रस आहे ही गोष्ट भूषणावह नसून लोकशाहीसाठी घातक आहे. सार्वभौम,समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे असे मत जोगदंड यांनी व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे प्रकाश घोरपडे म्हणाले की मुलांमध्ये देशभक्ती रुजवण्याचे काम शिक्षकांबरोबरच पालकांचे आहे. गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर बरेच कामगार आपले काम बंद करतात आणि मंडळाच्या उपक्रमात सहभागी होत नाहीत असे आढळून आले आहे. असे असेल तर राज्य शासनाने त्यांना दिलेला गुणवंत कामगार पुरस्कार परत घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक म्हणाले की हुतात्म्यांनी देशासाठी बलिदान केले त्यांची आठवण ठेवून स्वतःहून देशासाठी कामे केले पाहिजे. प्राणपणाने स्वातंत्र्य मिळविले
प्राणपणाने जपू या सारे
अनेकातून एकात्मता रे
वाढविण्यास्तव खपू या सारे..
ही देशभक्तीपर कविता त्यांनी सादर केली.
सुदाम शिंदे म्हणाले की मी या केंद्राची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले पण आता केंद्राची खूप दुरावस्था झाली आहे ती बघवत नाही. साधी डागडुगीही मंडळांने केलेली नाही अशी खंत व्यक्त केली.
यावेळी रोहिणी मिश्रा ,समीक्षा क्षीरसागर,अनुराधा क्षीरसागर यांनी देशभक्तीपर नृत्य करून सर्वांची मने जिंकली.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, प्रमुख पाहुणे प्रकाश घोरपडे, मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड ,ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, केंद्र संचालक अनिल कारळे,रयत शिक्षण संस्थेचे सदस्य सुदाम शिंदे, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहर उपाध्यक्ष काळुराम लांडगे, ह.भ. प. यादव तळोले , प्रकाश देवरुखकर , हापकीन कामगार प्रतिनिधी पांडुरंग सावंत,प्रथमेश सावंत, संगीता क्षीरसागर ,सुरेखा मोरे,रोहिणी मिश्रा , समीक्षा क्षीरसागर,अनुराधा क्षीरसागर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्र संचालक अनिल कारळे यांनी कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनेची माहिती देऊन सूत्रसंचालन केले तर सुरेखा मोरे यांनी आभार मानले.
