पिंपरी : ‘वकील आपल्या दारी’ हा देशातील पहिला आणि आगळावेगळा उपक्रम आहे!’ असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन, मुंबई येथे गुरुवार, दिनांक २० मार्च २०२५ रोजी काढले. गरीब आणि गरजू लोकांना तसेच कैद्यांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी ‘दर्द से हमदर्द तक ट्रस्ट’ने सुरू केलेल्या ‘लीगल एड ऑन व्हील्स’ (‘वकील आपल्या दारी’) या उपक्रमाचा राजभवन, मुंबई येथे माननीय राज्यपाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त ॲड.प्रकाश साळसिंगीकर, ॲड. सुनीता खंडाळे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे यांनी ट्रस्टच्या वतीने राज्यपाल राधाकृष्णन यांना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित केले.
ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी ‘लीगल एड ऑन व्हील्स’ अर्थातच ‘वकील आपल्या दारी’ या प्रकल्पाची माहिती देताना दर्द से हमदर्द तक ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्रातील सर्व कारागृहामधील अतिरिक्त प्रमाणात असलेल्या कैद्यांच्या गंभीर समस्येवर काम करताना तुरुंगामध्ये येणाऱ्यांची देखील संख्या कमी व्हावी या साठी काम करते म्हणजेच गुन्हा घडूच नये यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती करते व त्यांच्या समस्या या कोर्टापर्यंत जाण्यापासून थांबवते. तसेच अनेकांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन कायदेशीर साहाय्य पुरवते. तुरुंगातील कित्येक वर्षे खितपत पडलेल्या कैद्यांना मोफत कायदेशीर साहाय्य पुरवते. यासाठीच विशेष वाहनाची तजवीज केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी ‘वकील आपल्या दारी’ यासाठीच्या विशेष वाहनाची पाहणी केली; तसेच त्यासोबत असलेल्या कायदे विषयक प्रदर्शनाविषयी जाणून घेत विनामूल्य कायदेशीर सल्ला देणाऱ्या वकिलांशी संवाद साधला. यावेळी या उपक्रमाला शुभेच्छा देताना राज्यपाल पुढे म्हणाले की, ‘अतिशय कौतुकास्पद असलेला हा उपक्रम प्रसारमाध्यमांतून महाराष्ट्रातील सर्व गावखेड्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच या प्रकल्पाची व्याप्ती वाढविली पाहिजे. भविष्यात दर्द से हमदर्द तक ट्रस्टच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला निश्चितच आवडेल!’
सामाजिक कार्यकर्ते रवींद्र संघवी, संस्थेच्या ॲड. सायली गोरडे, ॲड. गणेश नागरगोजे, ॲड. नितीन हजारे व अन्य स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी ॲड. विघ्नेश्वर सुब्रमण्यम यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे संस्थेचे कामकाज समजावून सांगितले तर ॲड. ओमकार पाटील, ॲड खेताराम सोलंकी यांनी उपस्थित सर्वांची ओळख करून दिली.