पिंपरी (दिनांक : ३१ जुलै २०२४) नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ठीक ४:०० वाजता पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनाचे आयोजन ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे करण्यात आले आहे. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून नारायण सुर्वे ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोहर पारळकर अध्यक्षस्थान भूषवतील. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे स्वागतप्रमुख आहेत. संमेलनात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल (पद्मश्री नारायण सुर्वे विचार साधना पुरस्कार), चिंचवड येथील थरमॅक्स कामगार संघटना (पद्मश्री नारायण सुर्वे उत्कृष्ट औद्योगिक संबंध पुरस्कार) या संस्थांना आणि कवयित्री ललिता सबनीस (मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान), कविवर्य चंद्रकांत वानखेडे (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार) या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी सिन्नर येथील किरण भावसार (‘घामाचे संदर्भ’), यवतमाळ येथील सचिन शिंदे (‘पातीवरल्या बाया’), बेळगाव येथील बाळासाहेब पाटील (‘घामाची ओल धरून’) या साहित्यकृतींना पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. विनाशुल्क असलेल्या या संमेलनाचा लाभ सर्व काव्यरसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *