पिंपरी- पिंपरी विधानसभेसाठी भाजपामधील मातब्बर उमेदवारांच्या यादीमध्ये आता भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांचे नाव चर्चेत येऊ लागले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या तीव्र इच्छुक असताना पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून त्यांनी माघार घेतली होती. मात्र, 2024 साठी त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केल्याने भाजपकडून त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

तेजस्विनी कदम या विरांगणा सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा मतदार संघातच नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून त्या सामाजिक कार्य करत आल्या आहेत. तळागाळातील घटकापर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड पाहून त्यांना 2014 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि पक्षाचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर भारतीय जनता युवती मोर्चा शहर युवती अध्यक्ष पदाची धुरा सोपविली होती. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पिंपरी विधानसभेत नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यावर भर दिला. त्यांच्या कामाची धडाडी पाहून भाजपाचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी देण्यात आली. या पदाचा उपयोग त्यांनी समाजातील वंचित, दिनदुबळ्या, निराधार लोकांसाठी केला. महिलांचे संघटन मजबूत करुन पक्षाची ध्येय धोरणे बळकट करण्यावर त्यांनी अधिक भर दिला.

त्यांच्या कार्याचा प्रभाव पाहून पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर भाजपा युवती मोर्चाच्या प्रदेश सचिव पदाची धुरा सोपविली. या पदावर काम करताना त्यांनी राज्यभराचा दौरा केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना पिंपरी विधानसभेतून मताधिक्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र कार्य केले. त्यामुळे बारणे यांच्या विजयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पिंपरी मतदार संघावर दावा ठोकला आहे. निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी पक्षाच्या वरीष्ठ पातळीवर फिल्डींग लावली आहे. येणा-या काळात तेजस्विनी कदम या पिंपरी विधानसभेसाठी भाजपाचा प्रमुख चेहरा म्हणून समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *