पिंपरी :- राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित अरुण पवार यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त २७०० रोपांचे वाटप करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. नुकतेच अरुण पवार यांनी भंडारा डोंगरावर वृक्षारोपण केले. वृक्ष लागवड चळवळ वाढली पाहिजे या हेतूने त्यांनी लग्नाच्या वाढदिवशी राज्यातील विविध संस्थांना २७०० झाडांचे वाटप केले. यामध्ये मलकप्पा शिवशरण यांना १०० रोपे, श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेसाठी संस्थापक अध्यक्ष संतोष सुरवसे यांच्याकडे १०० रोपे, पंडीतगुरु पार्डीकर महाविद्यालय परळी यांना ११०० रोपे घेण्यासाठी अकरा हजार रुपयांचा निधी, सुदिक्षा फाउंडेशन १०० रोपे, विजय वाघमारे फाउंडेशन २०० रोपे, जनकल्याण प्रतिष्ठानसाठी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांच्याकडे ७०० रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या संस्थांना रोपे पोहोच करणे शक्य नव्हते, त्या संस्थांना निधी देऊन रोपे खरेदी करण्यास सांगितले आहे. अनेक संस्थांना २५ ते ५० झाडांचे वाटप केले आहे. यामध्ये पिंपळ, वड, करंज, आवळा, चिंच, कडुलिंब, चिकू, शिताफळ, नारळ, जांभूळ, आंबा, पेरू, लिंबू आदींची ५ ते ६ फूट उंचीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
वृक्षमित्र अरुण पवार यांनी सांगितले, संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे सांगत झाडांचे महत्त्व सांगितले. महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. त्याच वर्गाने तुकाराम महाराजांवरील श्रद्धेपोटी एक झाड घरोघरी लावण्यासाठी पुढे येऊन नवा आदर्श निर्माण करायला हवा, जमिनीची धूप थांबेल. माती वाहून जाणार नाही. धरणे गाळाने भरणार नाहीत. जलसंवर्धन मोठ्या प्रमाणात होईल. पर्जन्यमानात सुधारणा होईल. आपण लावलेल्या झाडाचा वर्षअखेर आढावा घ्यावा. आपण निश्चय केला तर महाराष्ट्रातील वनराईचे चित्र निश्चितच बदलेल. आज वातावरणात होणाऱ्या बदलामुळे वृक्ष लागवड काळाची गरज बनली आहे. सर्वच नागरिकांनी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमावर होणारा खर्च कमी करून झाडे लावण्याची गरज आहे. वृक्ष लागवड चळवळ वाढीस लागली पाहिजे, हा वृक्षवाटपाचा हेतू आहे.