पिंपरी – “सावरकरांविषयी गैरसमज पसरवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहेत. ते दूर करायचे असतील व सावरकरांचा त्याग आणि देशभक्ती जाणून घ्यायची असेल तर प्रत्यक्ष अंदमानला भेट देऊन तेथील सेल्युलर जेलमधील तत्कालीन यातनामय जीवन यांची माहिती करून घेतली पाहिजे” असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.
श्रीकांत चौगुले यांच्या क्रांतितीर्थ अंदमान या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचा प्रकाशन समारंभ चिंचवड येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जेष्ठ लेखक मधु जोशी, ह भ प किसन महाराज चौधरी, लेखक श्रीकांत चौगुले व पंकज पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती तर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ अशोक नगरकर, सदस्य प्रकाश पारखी, सुहास पोफळे, साहित्यिक डॉ सुरेश वाकचौरे, प्रकाशक नितीन हिरवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी प्रभुणे पुढे म्हणाले की “अखंड हिंदुस्तान हे सावरकरांचे स्वप्न होते. सध्या त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत, हा आशावाद वाटतो. अलीकडे अंदमानचा विकास झाल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. केवळ निसर्ग सौंदर्यच नाही तर राष्ट्रप्रेमाचा संस्कार घडविण्यासाठी अशा प्रेरक पुस्तकांची आवश्यकता आहे. चाफेकरांपासून सावरकरांनी प्रेरणा घेतली व स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्यांनी केलेल्या साहित्य निर्मितीतून देशभक्ती, देशप्रेमाचे दर्शन घडते. त्यासाठी सावरकरांचे साहित्य अभ्यासले पाहिजे.” मधु जोशी यांनी सावरकरांच्या संन्यस्त खड:ग या नाटकातील नांदी सादर केली होती, त्याला प्रत्यक्ष सावरकरांनी कशी दाद दिली. अशा काही आठवणी त्यांनी जागविल्या. अंदमान विषयक संवादात्मक कार्यक्रमात बी आर माडगूळकर, राजन वडके ,नंदकुमार मुरडे, तानाजी एकोंडे ,सुभाष चव्हाण आदींनी सहभाग घेतला. याप्रसंगी क्रांतितीर्थ अंदमान या पुस्तकाची हिंदी व इंग्रजी आवृत्ती केल्याबद्दल पंकज पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. किसन महाराज चौधरी यांनी प्रास्ताविक केले, सावता गिड्डे यांनी आभार मानले. सुजाता पोफळे यांनी जयोस्तुते हे गीत सादर केले. सूर्यकांत बरसावडे, राजेंद्रकुमार पाटील, ऍड प्रताप साबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.