-काळेवाडीत ज्योतिबा उद्यानात ‘मॉर्निग वॉक पे चर्चा’
पिंपरी (प्रतनिधी) :- मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी काळेवाडी येथील ज्योतिबा उद्यानात शनिवारी (4 मे) योगा ग्रुपच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेत भविष्यात मावळ लोकसभा मतदारसंघातील कामांबाबत भूमिका मांडून लोकसभेचे नेतृत्त्व करण्याची संधी द्यावी, असे आवाहन संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांना केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची “मॉर्निग वॉक डिप्लोमसी” प्रभावी ठरत आहेत. ते पिंपरी चिंचवड शहरातील विविध उद्यानात सकाळी मॉर्निग वॉकला जात नागरिकांशी संवाद साधून आपली भूमिका मांडत आहेत. त्यांनी काळेवाडी येथील ज्योतिबा उद्यानात आज पवना हेल्थ क्लब, जय बाबा स्वामी योग साधना ग्रुप आणि गार्डन ग्रुप या योगा ग्रुपच्या सदस्यांशी शनविारी संवाद साधला.
या वेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र (तात्या) तापकिर, पवना हेल्थ क्लबचे प्रभारी संजय पगारे, नेताजी नखाते, कालीदास मोरे, हरेष नखाते, गार्डन ग्रुपचे माऊली मलशेट्टी, सुरेश वीटकर, सिकंदर पटेल, संभाजी नढे, दिलीप जाधव, हगवणे साहेब, आप्पा नरळकर, नरेंद्र माने, राम पाटील, सुनिल जंगम, दिनेश नढे यांच्यासह ग्रूपचे पदाधिकारी, सदस्य व मॉर्निग वॉकसाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, दहा वर्षातील मोदी सरकारच्या कारभाराविरुध्द नाराजी आणि राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल प्रचंड चीड सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. सामान्य नागरिक, मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडण्याचे काम केले गेले. कामगारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षण आणि आरोग्याबाबत दुर्लक्ष झाले आहे.
ज्या पध्दतीने आपण आपल्या आरोग्याची काळजी घेती. स्वास्थ ठीक ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच पध्दतीने सर्वसामान्यांच्या समस्यांवर उपायोजना करून, आर्थिक घडी बसवून आणि सामाजिक बांधिलकी जोपासून देशाचे स्वास्थ उत्तम राखण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. या निवडणुकीत हा विचार करून आपले चिन्ह मशाल हाच पर्याय निवडा, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.