पिंपरी :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष विविध राज्यात चाचपणी करत आहेत. भाजप विरोधात देश पातळीवर इंडिया आघाडी स्थापन केल्याने आघाडीतील जागा वाटपावरुन विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. अरविंद केजरीवाल यांना महाराष्ट्रात मावळ लोकसभा मतदारसंघात आपचा उमेदवार उभा करण्याची विनंती रविराज काळे या तरुणाने केली आहे. अशात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीसुद्धा स्वबळावर लढणार या वक्तव्याने खळबळ निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौरा करुन राज्यातील लोकसभा जागावाटपाबाबत इंडिया आघाडीसोबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले. निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रात येण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले.
रविराज काळे यांनी सध्याच्या असणाऱ्या खासदारांबद्दल असणारी नाराजी निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी असल्याचे केजरीवाल यांना सांगितले. दरम्यान, जागावाटपाबाबत केजरीवाल साहेबच निर्णय घेतील, असेही काळे यांनी सांगितले.
आम आदमी पक्ष देखील महाराष्ट्रातील काही जागा लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी म्हटले होते. दरम्यान. आप इंडिया आघाडीचा भाग असल्याने अंतिम चर्चा झाल्यानंतर जागा वाटपाबाबत जाहीर केले जाईल असे सांगण्यात येत आहे.