पिंपरी :- “शिवराज्याभिषेक ही भारतीय इतिहासातील एक असामान्य घटना आहे. स्वत्व आणि स्वाभिमान जागवत अठरापगड समाजाला एकत्र करीत शिवरायांनी ऐतद्देशीयांचे सार्वभौम स्वराज्य निर्माण केले. मावळ्यांच्या पराक्रमाने जनकल्याणकारी राज्याची स्थापना झाली. संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्याची दखल घेत मराठ्यांच्या साम्राज्याची महती मान्य केली. म्हणूनच शिवस्वराज्य दिनाला विशेष महत्व आहे.” असे प्रतिपादन जेष्ठ शिवव्याख्याते राजेंद्र घावटे यांनी शाहूनगर , चिंचवड येथे केले.

शाहूनगर येथील श्री शाहू वाचनालयाच्या वतीने साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने “शिवस्वराज्य दिन” सोहळा साजरा करण्यात आला. जेष्ठ उद्योजक संजीव मांजर्डेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. वैशाली जोशी व वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, राजगोंडा पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आहे. सचिव राजाराम वंजारी यांनी प्रास्ताविक केले. राजाराम रायकर, मनीषा पाटील, राजेंद्र पगारे, नरेंद्र जयसिंगपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

घावटे पुढे म्हणाले की, “परकीय आक्रमकांनी सर्व भारतीय राज्ये नष्ट केली होती. या पार्श्वभूमीवर मरगळलेल्या समाजाला जागे करण्याचे काम शिवरायांनी केले. प्रतिकूल परिस्थितीत निर्मिलेल्या स्वराज्याला इतर सत्ताधीश मराठ्यांचे बंड म्हणून संबोधत असत. राज्याभिषेकमुळे शिवराय छत्रपती झाले आणि त्यांची कीर्ती त्रिखंडात पोहोचली. सर्वदूर हिंदवी स्वराज्याला मान्यता मिळाली. नवीन कालगणना, नाणी, राज्यव्यवहार कोष आणि अष्टप्रधान मंडळ, लोकाभिमुख प्रशासन यामुळे राज्याभिषेकाला विशेष महत्व आहे. शिवरायांच्या नंतरच्या कालखंडातील त्याचप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांची स्फूर्तीचे स्फुलिंग हे आपणाला शिवराज्याभिषेकात आढळते.”
कार्यक्रमाचे संयोजन अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रवींद्र अडसूळ यांनी केले.
सूत्रसंचालन राजेंद्र पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र जयसिंगपुरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *